देशाचे संविधान आणि लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान देण्याचे काम सुरू असून, देशात नाहक वाद निर्माण केले जात आहेत. यामुळे गरीब-शोषित जनतेच्या गंभीर होत जाणाऱ्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत, तर दुसरीकडे विचार मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही केली जात आहे. या साऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याची गरज असून, नव्या समाजरचनेसाठी विद्यार्थी-युवकांनी संघटीत व्हावे, असे आवाहन, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.
कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअिरग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड गोिवद पानसरे युवाजागर निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअिरग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या दोनदिवसीय शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रा.जयदेव डोळे (औरंगाबाद) यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. अशोक चौसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी उमा पानसरे, प्रा. डॉ. मेघा पानसरे, प्रा. डॉ. मंजुश्री पवार उपस्थित होते.
प्रा. डोळे यांनी ‘धर्म, धर्माधता व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. तसेच दुसऱ्या एका सत्रात त्यांनी ‘देशातील आजचे शैक्षणिक वास्तव’ या विषयावर मागदर्शन केले. त्यानंतरच्या सत्रात ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ (सातारा) यांनी ‘भारताचे संविधान’ या विषयावर, ज्येष्ठ अभ्यासक दत्ता देसाई (पुणे) यांनी ‘आजचा वाद आणि भारतीय राष्ट्रवाद’ तसेच ‘विकास : कशाचा? कोणाचा?’ या विषयावर, प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी ‘भारतातील राजकीय पक्षांची ओळख’ तसेच ‘महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेताना’ या विषयावर आणि प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी ‘भारतीय संस्कृतीची ओळख’ या विषयावर शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.