कोल्हापूर महापालिकेच्या आठव्या पंचवार्षकि निवडणुकीच्या प्रक्रियेचा पडदा उद्या मंगळवारी उघडत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात होणार असून, सलामीच्या दिवशी किती अर्ज दाखल होतात, याचे कुतूहल आहे. राज्य निवडणूक आयोग व महापालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेमध्ये लक्ष घातले असून सोमवारी महापालिकेचे अधिकारी तसेच राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख चार पक्षांनी बहुतांशी उमेदवार जाहीर केले असले तरी येत्या दोन-तीन दिवसांत सर्व ८१ उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संगणक प्रणालीद्वारा अर्ज दाखल करण्याची पहिलीच वेळ असल्याने तंत्रकुशल तज्ज्ञांसमोर इच्छुक उमेदवारांना शरण जावे लागत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ खऱ्य अर्थाने मंगळवारी होत आहे. ६ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करावे लागणार आहेत. अर्ज सादर करण्याचा मंगळवार हा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्याची तयारी अनेक इच्छुकांनी केल्याचे दिसत होते.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करण्यापासून ते निवडणुकीतील महत्त्वाच्या कामांची माहिती देण्यासाठी सोमवारी प्रशिक्षण शिबिर राबवले. पहिल्या सत्रामध्ये ७ विभागीय कार्यालयांतील निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, द्वितीय सहायक निवडणूक अधिकारी यांच्याबरोबरच महापालिकेतील संगणकावर काम करणारे कारकून यांना प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस व सहका-यांनी प्रशिक्षण देताना इच्छुकांच्या शंकांचे निरसन केले. दुस-या सत्रामध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले.
महापालिकेवर सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सक्षम उमेदवारांचा शोध घेऊन उमेदवारी यादी जाहीर करण्याची प्रक्रिया गेले दोन आठवडे सुरू होती. भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने यामध्ये आघाडी घेतली असून ६२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. शिवसेनेने ५८ तर राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य शक्ती पक्ष आघाडीने ५५ नावांची घोषणा केली आहे. मावळत्या सभागृहात सर्वाधिक ३३ सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेस पक्षाला उमेदवारांचा शोध घेताना अडचणी येत असल्याचे दिसत आहे. या पक्षाने आत्तापर्यंत फक्त १८ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्वच पक्ष अंतिम यादी जाहीर करण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी मतदारयादी बनविण्याचे काम प्रशासनाने केले आहे. या मतदारयाद्या महापालिकेच्या संकेतस्थळासह सात विभागीय कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा