शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानी मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
कोल्हापूर येथे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याकरीता टप्प्या टप्प्याने एकूण ६५ शिक्षकीय व ५० शिक्षेकत्तर अशा एकूण ११५ पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेलीआहे. तसेच नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याकरीता एकूण रु.२२१.४८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, उर्जानिर्मिती इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणात झालेला औद्योगिक विस्तार तसेच सूत गिरणी, साखर कारखाने, कापड गिरण्या, फाऊंड्री, मशिन शॉप इत्यादींचा औद्योगिक विस्तारातील सहभाग लक्षात घेता, कोल्हापूर जिल्हयामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता होती.यामध्ये आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अॅन्ड डाटा सायन्स, मेकॅनिकल अॅन्ड ऑटोमेशन इंजिनिअरींग,कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग ही अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.