कोल्हापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा खेळ आणखी रंगात आला आहे. ताराराणी आघाडीने नामनिर्देशित केलेले माजी महापौर सुनील कदम यांना ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून रोखण्याचा प्रयत्न सर्वसाधारण सभेमध्ये झाला होता. त्यांनतर कदम यांना विरोध करणारा ठराव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला.
ठराव नगरविकास विभागाकडे समक्ष देण्यासाठी शुक्रवारी कर्मचारी पाठविण्यात आला. सत्तारूढ गटाचे अभिवेदन शासनाकडे पाठवण्यात आले असले तरी विरोधी गटाचे अभिवेदन पाठवण्याचे टाळण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या काही प्रमुख कारभाऱ्यांचा कदम यांना सभागृहात घेण्यास विरोध आहे. केवळ त्यांच्या हट्टापायी सभागृहाने एकदा नव्हे, तर तीन वेळा तो बहुमताने नामंजूर केला. राज्य सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घेण्यास सभागृहाला संधी दिली होती; परंतु राजकीय विरोधामुळे तो नामंजूर करण्यात आला.
विशेष म्हणजे भाजप व ताराराणी आघाडीचे अभिवेदन या ठरावासोबत पाठविण्यात आलेले नाही; त्यामुळे आघाडीचे नगरसेवक स्वतंत्रपणे ते राज्य सरकारकडे पाठविणार आहेत.
आता राज्य सरकारला स्वत:च्या अधिकारात निर्णय घ्यावा लागणार आहे. सभागृहाने बहुमताने नामंजूर केलेला ठराव राज्य सरकार विखंडित करून कदम यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करू शकते. हे प्रकरण न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader