इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयात शुक्रवारी धार्मिक पेहराव करुन महाविद्यालयात येणार्यावरुन वादाचा प्रसंग घडला. त्यातून मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काही काळ तणाव पसरला. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत या आठवड्यात दुसऱ्यांदा धार्मिक मुद्द्यावरून वादाचा प्रसंग उद्भवला .
हेही वाचा >>> कोल्हापूरला पावसाने झोडपले; ४५ बंधारे पाण्याखाली
डीकेएएससी महाविद्यालयात सकाळच्य सुमारास दोन महाविद्यालयीन युवक गळ्यात भगवे स्कार्फ घालून आले. त्यांना सुरक्षारक्षक, शिक्षकांनी प्रवेशद्वारातच थांबवत हे स्कार्फ ठेवा आणि परत जाताना घेऊन जा असे सांगितले. याबाबतची माहिती समजताच काही विद्यार्थी तेथे आले व त्यांनी इतर धर्मियांना चालते मग आम्हाला का नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यावरुन शाब्दिक वाद झाला. याचवेळी बुरखा घालून आलेल्या काही विद्यार्थींनींनाही प्रवेशद्वारात थांबवण्यात आले. या प्रकाराची माहिती समजताच दोन्ही समाजातील समर्थक मोठ्या संख्येने महाविद्यालयासमोर एकत्र आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. शांततेचे आवाहन करूनही ऐकत नसल्याने पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरु केल्याने धावपळ उडाली. प्राचार्यांनी वरिष्ठांची चर्चा करून होणार्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.