कोल्हापूर : नैऋत्य मौसमी पावसाचे आज महाराष्ट्रात आगमन झाले असताना कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात तो चांगलाच बरसला. कागल, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात गुरुवारी या पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेती कामांना उपयुक्त ठरला आहे.
जून महिना सुरू झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या लहान-मोठ्या सरी बरसत आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी आज ट्विटद्वारे पावसाची शुभ वार्ता कळवली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आज सहा जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. रत्नागिरी, सोलापूर पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले आहे, असे त्यांनी कळवले आहे.
हेही वाचा – कोल्हापुरात नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
हेही वाचा – तापमान वाढ रोखण्याचा कोल्हापुरात पर्यावरण दिनी निर्धार
याचा प्रत्यय आज कोल्हापूर जिल्ह्यात आला. सकाळपासून काळे ढग आकाशात जमले होते. सायंकाळी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. इचलकरंजी, हातकनंगले, शिरोळ तालुक्याच्या बऱ्याच भागांमध्ये पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतक्या कालावधीत आलेल्या पावसाने परिसर जलमय झाला. यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग दिला आहे.