कोल्हापूर : Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire तब्बल १०९ वर्षे ज्या जागेत विविध कलांचे आविष्कार फुलले, जिथे अनेक नवोन्मेष कलाकारांपासून ते ज्येष्ठ कलातपस्वींपर्यंत प्रत्येकाने त्या भूमीला वंदन करत कला सादर केली. अशा एका महान नाट्यतपस्वी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने पुलकित झालेली कलावास्तू आणि आठवणी गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झाल्या.
आज ही वार्ता ऐकून अनेक कलाकारांचे पाय या नाट्यगृहाजवळ धावले तेव्हा त्यांना तिथे केवळ भग्न जळीत भिंती आणि राखेचे ढीगच दिसून आले. भावूक झालेल्या या रंगकर्मीनी अखेर त्या राखेतच हात घालत आठवणींना वाट मोकळी करून दिली. या राखेचेच काही अंश बरोबर घेत जड पावलांनी हे कलाकार माघारी फिरले. कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री उशिरा आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले . कालपर्यंत कोल्हापूरचा दिमाख असलेली ही इमारत आज केवळ भग्न जळीत भिंती आणि राखेच्या ढीगामध्ये उभी होती.
हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृह आग: कारणे दाखवा नोटीस मिळालेले अधिकारी करणार आगीची चौकशी
या नाट्यगृहाच्या माझ्या जुन्या आठवणी आहेत. ‘अस्तित्व’ या नाटकाला राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळाले. नाट्यगृह आगीत नष्ट होणे ही अत्यंत क्लेशदायी घटना असते. – भरत जाधव, प्रसिद्ध अभिनेते
कोल्हापूरचे नाट्यक्षेत्र जिवंत ठेवण्याचे काम या नाट्यगृहाने केले होते. शासनामार्फत पूर्वी आहे त्या जागीच नाट्यगृह पुन्हा उभारले जावे, अशी अपेक्षा आहे. नाट्य परिषदेमार्फत शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. – प्रशांत दामले, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद
© IE Online Media Services (P) Ltd