करवीरनगरीच्या महापौर निवडीच्या कमालीच्या ताणलेल्या नाटय़ाचा परमोच्च बिंदू गाठताना काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांनी सहजसोप्या विजयाची नोंद करीत भाजपाच्या सविता भालकर यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांनी ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके यांना पराभूत केले. दोन्ही निवडी ४४ विरुध्द ३३ अशा मतांनी झाल्याने उभय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन फटाक्यांची आतषबाजी केली. शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अनुपस्थिती दाखवली, मात्र उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित राहत आपल्या बदलत्या राजकीय रंगाचे दर्शन घडवले.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी भाजप – ताराराणी आघाडी व शिवसेना असा चौरंगी सामना झाला होता. निकालानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप – ताराराणी आघाडीने निवडणुकीपूर्वी महायुती करुन ३२ जागा मिळविल्या होत्या. तर कांॅग्रेस-राष्ट्रवादीने निवडणुकीनंतर आघाडी करुन ४२ इतक्या म्हणजे बहुमतापर्यंतच्या जागा मिळवित सत्तेचा दावा केला. तरीही भाजप- ताराराणीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व अपक्ष आपल्याला मदत करतील व आणखी काही चमत्कार घडेल आणि महापौर भाजपचा होईल असे भाकीत करीत राहिल्याने अंदाज वर्तविणे कठीण बनले होते.
सोमवारी सकाळी पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर निवडीसाठी नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा अकरा वाजता आयोजित केली होती. महापौरपदाच्या निवडीच्या प्रक्रियेतून ताराराणीच्या स्मिता माने यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या अश्विनी रामाणे व भाजपच्या सविता भालकर यांच्यात लढत झाली. हात वर करुन मतदान घेतले असता रामाणे यांना ४४ तर भालकर यांना ३३ मते पडली. या वेळी सभागृहात ८१ पकी एकूण ७७ नगरसेवक उपस्थित होते.
यानंतर उपमहापौरपदासाठी निवड प्रक्रियेतून भाजपचे संतोष गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला व ताराराणीचे राजसिंह शेळके यांच्यात लढत झाली. मुल्ला यांना ४४ व शेळके यांना ३३ मते मिळाली.उपमहापौर पदाची प्रक्रिया सुरु असताना शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात आले. पण त्यांनी मतदानात भाग न घेता तटस्थ भूमिका घेतली. पीठासन अधिकारी डॉ. अमित सनी यांनी महापौर अश्विनी रामाणे व उपमहापौर शमा मुल्ला यांची निवड जाहीर करुन सत्कार केला.
करवीनगरीच्या महापौरपदी अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदी शमा मुल्ला
शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अनुपस्थिती
Written by अपर्णा देगावकर
आणखी वाचा
First published on: 17-11-2015 at 03:50 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwini ramani elected mayor and shama mulla elected deputy mayor of kolhapur