कोल्हापूर : भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देत नाही. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या समर्पणाची पक्षाने दखल घेतली असून त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर विधिमंडळात संधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. तसेच, पक्ष प्रवेशावेळी दिलेल्या शब्दानुसार राहुल आवाडे हेच भाजपाचे इचलकरंजीतील उमेदवार असतील असे नमूद करीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर इचलकरंजीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. अद्याप आवाडे पितापुत्रांचा भाजप कार्यालयात प्रवेश झालेला नाही. अशातच विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने पक्षाने नाराजीची दखल घेत शहर कार्यालयाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते.

हेही वाचा >>>चंदगडमधील उमेदवारीचा वाद गोवामार्गे मुंबईत; महायुतीत नाव पेच, प्रमोद सावंतांच्या घोषणेने महायुतीत ठिणगी

सुरेश हाळवणकर म्हणाले, कार्यकर्ता, दोनदा आमदार ते प्रदेश उपाध्यक्ष असे पक्षाने सर्व काही दिल्याने मी नाराज नाही. विधानसभेला आवाडे यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा निर्णय मान्य केला आहे. पक्षाचा उमेदवार विजयी करण्याची बांधिलकी आहे. भाजप आणि आवाडे यांचे कार्यकर्ते मनाने एकत्र आलो तर इचलकरंजीचा आमदार उच्चांकी मतांनी विजयी होईल. शिरोळ, हातकणंगले येथेही आपला उमेदवार विजयी होईल.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा >>>हसन मुश्रीफ – समरजीत घाटगे यांच्यातील वादाने टोक गाठले

हाळवणकरांसोबतच्या मतभेदला पूर्णविराम – प्रकाश आवाडे

आवाडे – हाळवणकर मतभेदाला पूर्णविराम मिळालेला आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार आहोत. एकत्र येऊन आम्ही भाजपचे काम करणार आहोत हे महत्त्वाचे आहे, असे मत आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी व्यक्त केले.

इचलकरंजी येथे शहर भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित केला असला, तरी त्यास आमदार आवाडे यांना निमंत्रित केले नसल्याने त्याची चर्चा होती. मात्र, या मेळाव्यानंतर बावनकुळे यांच्यासह निमंत्रित नेत्यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.

हेही वाचा >>>कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासकीय निधीची वानवा

यानंतर आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा आवाडे – हाळवणकर यांच्यातील वादाकडे लक्ष वेधले. आमदार आवाडे म्हणाले, की आमच्यातील वाद आता संपले आहेत. दोन्हीकडील कार्यकर्त्यांचे शंभर टक्के मनोमिलन होईल. निवडणुकीला भाजप – ताराराणी पक्ष असे एकत्रित सामोरे जाणार आहोत. जिल्ह्यात भाजप अतिशय ताकतीने लढून जिंकेल. चांगल्या मताधिक्याने राहुल आवाडे निवडून येतील.

राहुल आवाडे म्हणाले, ‘‘आजच्या मेळाव्याचे निमंत्रण नव्हते; पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा घरी येण्याचा दौरा ठरलेला होता. राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे असल्याने सर्वजण एका विचाराने आलो आहोत. गैरसमज असतील, ते एकत्र बसून सोडवू. आम्ही केवळ या निवडणुकीपुरते नव्हे, तर कायमस्वरूपी एकत्र आलो आहोत.’’