कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणारे चंदन झाड चोरून नेण्याचा प्रयत्न अज्ञात चोरटय़ांनी केला. रविवारी पहाटे ही घटना घडली. पोलिसांना पाहताच चोरटय़ांनी या ठिकाणाहून पलायन केले. याबाबत अज्ञात चोरटय़ाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक चंदनाचे झाड आहे. हे झाड  रविवारी पहाटे ३ ते ४ या वेळेत चोरून नेण्याचा प्रयत्न अज्ञात चोरटय़ांनी केला. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस रविवारी पहाटे गस्त घालत नागाळा पार्क परिसरात गेले होते. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाड तोडण्याचा आवाज आल्याने ते ठिकाणी जात होते,  मात्र पोलिसांना बघून चोरटय़ांनी पलायन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चंदन चोरीचा हा प्रयत्न फसला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पहारेकरी शिवाजी घोलप यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातीलच चंदनाच झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे प्रशासन ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा वृक्ष संगोपनाचा संदेश देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चोरटय़ांनी चक्क चंदनाचे झाड तोडल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सी.सी.टी.व्ही आणि सुरक्षा रक्षक असताना झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याने तर्क वितर्क करण्यात येत आहेत.