कोल्हापूर : औरंगजेब, अफजलखान यांच्या कबरी ही महाराष्ट्राच्या पराक्रमाची स्मारके आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठेशाहीच्या देदीप्यमान पराक्रमी इतिहासाची ती साक्ष आहेत. तीच काढून टाकली तर उद्याच्या पिढीस आपण काय सांगणार, असा थेट प्रश्न ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी जाहीरपणे सध्याच्या वादासंदर्भात संबंधितांस विचारला.

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते त्यांचा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पवार बोलत होते. यावेळी डॉ. लवटे यांच्यावरील ‘साहित्य विमर्श’ आणि ‘अमृत मंथन’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन झाले.

यावेळी डॉ. पवार यांनी सद्या:स्थितीत इतिहासाची मोडतोड होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, की इतिहासाचा अभ्यास नसलेल्यांकडून हल्ली नव्या पद्धतीने इतिहास ऐकून घ्यावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची दोनदा लूट केल्याचा इतिहास असताना त्यांनी सुरत लुटलीच नाही, अशी भलतीच माहिती आताचे राजकारणी देत असतात. त्यामुळे इतिहासाविषयी काय बोलावे असा प्रश्न पडतो. तरीही इतिहासातील दाखले ठामपणे देणे हे इतिहासकारांचे काम आहे. त्यांनी हे कर्तव्य सांप्रत काळात ठामपणे केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी ‘महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा : इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर कुबेर यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, की भारतात आर्थिक सुधारणा सुरू झाल्यानंतर १९९१ नंतर मध्यमवर्गीयांना चांगले दिवस आले. त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. मात्र अर्थसंपन्नता जशी आली तशी वैचारिक संपन्नता कमी झाली. तेव्हा आर्थिक प्रगती आणि प्रबोधन यांचा काही संबंध असतो का, याची तपासणी व्हायला हवी. या संदर्भात त्यांनी जगातील सर्वांत संपन्न नागरिक असलेल्या अमेरिकेचा दाखला दिला. दरडोई उत्पन्नात इतके आघाडीवर असूनही सामाजिकतेच्या मुद्द्यावर अमेरिकी नागरिक तितका प्रागतिक नाही, असे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले.

वैचारिकतेची आस कमी झाली, की लोकशाही धोक्यात येते. महाराष्ट्राची संतांची परंपरा ही येथील तर्कवादाचे उगम आहे. महाराष्ट्राचा तुटलेला वैचारिक धागा कसा जोडायचा हा प्रश्न आहे, असा मुद्दा कुबेर यांनी या वेळी उपस्थित केला.

एकेकाळी सामाजिक कार्याला सर्व थरातून मदत मिळत होती. सरकारचेही साहाय्य असायचे. पण आता तिथूनच निर्बंध घातल्याने कामाला मर्यादा येत आहेत, असा उल्लेख करून डॉ. लवटे म्हणाले, की वंचितांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची अवस्था ‘बाप खाऊ घालेना अन समाज भीक मागू देईना’ अशी झाली आहे. ‘कल्याणकारी सरकार’ ही संकल्पना नाहीशी होते की काय, अशी भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

प्राचार्य डॉ. पी. जी. माळी यांनी स्वागत केले. प्रा. प्रशांत गोंधळी, संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. विश्वास सुतार, लता लवटे, अशोक चौसाळकर यांच्यासह सामाजिक चळवळींशी संबंधित अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमास मोठी गर्दी झाल्याने सभागृहाबाहेर मोकळ्या मैदानावर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यांचे वाचन अधिक!

शिक्षणाचा प्रचार – प्रसार झाल्याने आज बहुजन समाजातील तरुणांना चांगले दिवस आले आहेत. कोटीकोटीचे बंगले हे तरुण बांधतात. त्यांचे राहणीमान सुधारलेले आहे. पण त्यांच्या आलिशान बंगल्यात पुस्तकांना स्थान नाही. या वर्गाचे वाचन खुंटले आहे. वाचनाबाबत दलित तरुणांना विचारा; तो धडाधड पुस्तकांची नावे सांगतो. ही दलित मुलं बहुजनांच्या दहा कोस पुढे गेली आहेत. कारण त्यांच्या नेत्याने दिलेला ‘वाचा आणि शिका’ हा संदेश ते तंतोतंत पाळतात. अशावेळी बहुजनांचा वाचनाचा तुटलेला धागा ही खंतावणारी बाब आहे, अशा शब्दांत डॉ. पवार यांनी बहुजन समाजातील सद्या:स्थितीवर बोट ठेवले.

‘लोकसत्ता’ एकमेव वाचनीय

‘लोकसत्ता’ हे एकमेव वृत्तपत्र असे आहे ज्याचे संपादकीय वाचण्यासारखे असते. ‘लोकसत्ता’ची संपादकीये ही प्रबोधनाला पुढे नेणारी आहेत, अशा शब्दांत डॉ. जयसिंगराव पवार यांनी या वेळी ‘लोकसत्ता’चा गौरव केला.