करोनाच्या प्रादुर्भावामुळे काम बंद झाल्याने हातावर पोट असणार्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबियांस गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या व्यावसायिकांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने १० हजार रुपयापर्यंत ‘विनातारण कर्ज योजना’ कार्यान्वित केली आहे. अडचणीच्या काळात बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळाला आहे. या योजने अंतर्गत अंदाजे दहा हजार लोकांना मदत होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी दिली.
इचलकरंजी शहरामध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक छोटे व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या अडचणीमध्ये प्रवासी व मालवाहतूक वाहनधारक, टॅक्सी, रिक्षा, केशकर्तनकार, परीट व्यावसायिक इत्यादी प्रकारचे व्यवसाय मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद आहेत. हे व्यवसाय नजिकच्या काळात लवकर सुरु होतील अशी आशा वाटत नाही. या समस्येतून मार्गक्रमण करण्यासाठी व त्यांचा कौटुंबिक चरितार्थ चालण्यासाठी कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्यावतीने संबंधीत व्यावसायिकास १० हजार रुपयापर्यंत विनातारण कर्ज योजना कार्यान्वित केलेली आहे.
यासाठी दरमहा केवळ ३०० रुपये इतक्या अल्प रक्कमेचा हप्ता भरावा लागणार आहे. कर्ज परतफेडीची मुदत पाच वर्षे राहणार असून पहिले सहा महिने हप्ता भरावा लागणार नाही. तसेच या कर्जावर वेळेत परतफेड करणार्या कर्जदारांना व्याजात रिबेटही दिले जाणार आहे. आवाडे जनता बँकेने नैसर्गिक आपत्ती वेळी आर्थिक आधाराच्या अनेकविध योजना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राबविल्या आहेत. बँकेचे उपाध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, संचालक स्वप्नील आवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत, संजय सातपुते, संजय शिरगावे व किरण पाटील उपस्थित होते.