कोल्हापूर : राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता येण्याचे संकेत असताना इचलकरंजीतील माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली टेक्स्टाईल पार्कला १ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी बुधवारी मंजूर करण्यात आला. याबाबत राज्याच्या सहकार, वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय जारी केला असून कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कला हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सत्तेचे पहिले फळ कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचले आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूर: मताधिक्याइतके वृक्ष लागवडीचा राहुल आवाडे यांचा संकल्प
तारदाळ येथे हा टेक्स्टाईल पार्क उभारला जात आहे. याकरिता केंद्र पुरस्कृत एकात्मिक वस्तू उद्योग संकुल योजनेतून जितका निधी दिला जाईल तितकाच निधी राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या वस्त्रोद्योग संकुलास केंद्र शासनाने आत्तापर्यंत २२ कोटी ८९ लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. राज्य शासनाकडून देय ५ कोटी १५ लाख अर्थसाहाय्यातून आतापर्यंत २ कोटी ७० लाखाचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे. उर्वरित देय २ कोटी ४५ लाख पैकी १ कोटी ६६ लाख रुपये अर्थसाहाय्य आज मंजूर करण्यात आले.