कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी निवडी मध्ये बुधवारी धक्कादायक हालचाली झाल्या. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. त्याजागी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. ए. वाय. पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घेतलेली भूमिका नडली असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूरमध्ये भाजपच्या दाव्याने पेच, शिंदे गटाची कोंडी
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ए. वाय. पाटील यांनी त्यांचे मेहुणे, कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. एका परीने हे हसन मुश्रीफ यांना आव्हान होते. कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ए. वाय. पाटील यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती.
हेही वाचा >>> अंधाऱ्या रात्री कोल्हापूर दीपोत्सव, रोषणाईने उजळले
त्यांनी असे काही करण्यापूर्वीच आज अचानक पदावर हटवून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना जिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, शाहूवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यासारख्या ग्रामीण भागातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, नेते यांची मोट बांधून राष्ट्रवादीला जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटील व्यक्त केली.