पानसरे हत्या प्रकरणाचा पुढील तपास होईपर्यंत समीर गायकवाडला जामीन मिळावा अथवा त्याच्याविरुद्धचे आरोप निश्चित करावेत, अशी मागणी करणारा अर्ज समीरच्या वकिलांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर मंगळवारी सादर केला. यावर बिले यांनी आरोप निश्चितबाबत २९ मार्च रोजी तर जामीनअर्जावर १४ मार्च रोजी सुनावणी होईल, असे आदेश दिले. उच्च न्यायालयासोबतच सत्र न्यायालयात तपास अहवाल सादर करण्याचे आदेश तसेच तपास यंत्रणांना दिले.
पानसरे हत्येप्रकरणी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी सरकारी वकील चंद्रकांत बुधले, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत व समीरवर दोषारोप निश्चित करू नये असा अर्ज बिले यांच्यासमोर सादर केला. यावर समीरचे वकील अॅड. पटवर्धन यांनी आक्षेप घेत म्हणणे मांडण्यास १० मिनिटांचा अवधी देण्याची मागणी केली.
यानंतर पटवर्धन यांनी आपली बाजू मांडत १७३ (८) नुसार पोलिसांनी तपास खुला ठेवला असून, पुरवणी दोषारोप दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. चार्जशीट दाखल केले असताना आरोप निश्चित न करणे हे आरोपीच्या मानवी हक्कांची पायमल्ली आहे.
यावर सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी आक्षेप घेत पानसरे हत्येप्रकरणी नेमलेली एसआयटी, दाभोलकर हत्येचा तपास करणारी सीआयडी, तसेच कलबुर्गी हत्येचा तपास करणारी बंगलोर सीआयडी यांची एकत्रित बठक १० मार्च रोजी होणार आहे. या बठकीत तीनही तपास यंत्रणा तपासातील प्रगतीबाबत समन्वय साधणार आहेत. तसेच तपासातील अहवाल सोमवार (दि. २८) रोजी उच्च न्यायालयात सादर करणार आहेत. यामुळे समीरवर तूर्तास चार्जफ्रेम करू नये तसेच सुनावणी तहकूब करावी अशी मागणी बुधले यांनी न्यायालयाकडे केली.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्ती एल. डी. बिले यांनी २० दिवसांसाठी सुनावणी तहकूब करत पुढील सुनावणी मंगळवार होईल असे आदेश दिले.