राज्यातील दोन बडय़ा दिवंगत नेत्यांचे पुतळे करवीरनगरीत आकाराला येत आहेत. िहदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे संताजी चौगले या शिल्पकर्मीकडून दोन्ही पुतळे साकारले जात आहेत.
करवीरनगरीतील कलेचे स्थान अग्रस्थानी आहे. यात भर घालणाऱ्या दोन कलाकृती आकाराला येत आहेत. ठाकरे यांचा हा पुतळा शहराजवळ असलेल्या शिये येथील शिल्पकार संतोष चौगुले यांच्या कार्यशाळेत बनवला जात आहे. या पुतळ्याचे अवलोकन सप्टेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. पुतळा पाहून ते भावुक झाले होते. त्यांनी २२ फुट उंचीच्या पुतळ्याची पाहणी करून काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्यानुसार बदल घडवण्यात आले आहेत. कल्याण-डोंबवली महानगर पालिकेच्या वतीने काळा तलावाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या १० दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. सुमारे ४ टन वजनाचा हा पुतळा आहे. चौगले गेल्या दीड वर्षांपासून या कामात गुंतले होते.
दरम्यान, संताजी चौगले हे दिवंगत आर. आर. पाटील यांचाही पुतळा तयार करत आहेत. ९ फुटी पूर्णाकृती पुतळा आबांची कर्मभूमी असलेल्या तासगाव बाजार समिती आवारात बसवला जाणार असून त्याचे वजन ७५० किलो आहे. या पूर्णाकृती पुतळ्याच्या चेहऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. पुतळ्यासाठी ३० लाख रुपये खर्च येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजनही तासगाव मध्ये अलीकडेच पार पडले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. अतिशय रेखीव असलेल्या या पुतळ्याच्या चेहऱ्याचे काम पूर्ण झाले असून आबांचा हुबेहूब चेहरा तयार करण्यात आला आहे. पुतळा बनविण्यासाठी ब्राँझसह विविध धातूंचा वापर करण्यात आला आहे. पुतळा कसा असावा यासाठी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबीयांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यासाठी शेकडो छायाचित्रांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत चेहऱ्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारी २०१७ अखेपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.