स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या भरघोस आíथक मदतीमुळे आमच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे. तरीही निराधार माहितीच्या आधारे ‘बळिराजा’चे संजय पाटील घाटणेकर हे आमच्या कुटुंबांची राजकीय स्वार्थासाठी नाहक बदनामी करीत असून त्यांनी ती न थांबविल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा, शहीद शेतकरी चंद्रकांत नलवडे यांच्या पत्नी सारिका नलवडे व आई छबुताई नलवडे यांनी दिला आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भास्कर कदम, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले यांच्याकडे दिले आहे. या निवेदनाच्या प्रती शुक्रवारी येथे पत्रकारांना देण्यात आल्या.
बळिराजा शेतकरी संघटनेचे घाटणेकर यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनात बळी पडलेल्या दोन कुटुंबीयांच्या नावाने मिळवलेल्या निधीमध्ये गरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. २० लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन मोठय़ा प्रमाणात निधी मिळवला असताना केवळ ३ लाख रुपये दोन शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले असून जमा झालेला उर्वरित निधी कोठे गेला याचा खुलासा शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी करावा, असे आव्हान दिले होते.
घाटणेकर यांनी दिलेले आव्हान स्वाभिमानीच्या जिव्हारी लागले. स्वाभिमानीने नलवडे कुटुंबीयांची भेट घेऊन वस्तुस्थितीची विचारपूस केली असता वसगडे येथील नलवडे कुटुंबीयांनी १८ लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याचे मान्य केले. तसेच या प्रश्नी घाटणेकर करीत असलेल्या आरोपांचा इन्कार करतानाच त्यांच्याविरोधी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिल्याने शेतकरी संघटनातील गटातटाचे राजकारण व संघर्ष वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा