दयानंद लिपारे

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या बरोबरीनेच पक्षीय पातळीवर उमेदवारी निश्चितीच्या हालचालींना वेग आला असताना कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसुंदीने डोके वर काढले आहे. कोल्हापुरात रंगणारा कलगीतुरा नव्याने राजधानी मुंबईत रंगला. विद्यमान खासदारांना उमेदवारी नको असा सूर आमदारद्वयीने पक्षनेत्यांकडे लावून धरला. आधीच या वादाने त्रस्त  असलेल्या पक्षनेतृत्वाच्या कोंडीत भर पडली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की उमेदवारीवर दावा सांगितलेले आमदार हसन मुश्रीफ यांच्या पदरात दान पडणार हे लक्षवेधी बनले आहे. कोल्हापूरच्या गडावरील पसंती-नापसंतीचा फटका बालेकिल्लय़ाला बसण्याची धोका निर्माण झाला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हा गेल्या वर्षभरापासून वादाचा विषय बनला आहे. विद्यमान खासदारांनी उमेदवारी दिली जाण्याचे संकेत आहेत. त्याचा विचार झाल्यास कोल्हापुरातून महाडिक यांना पुन्हा उमेदवारी मिळण्यास काहीच हरकत नसली पाहिजे. पण राजकारणात इतके साधे सरळ समीकरण बहुधा आकाराला येत नसावे. कोल्हापुरातील राष्ट्रवादीतील गोंधळ पुन:पुन्हा हेच दर्शवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चार महिन्यापूर्वी आढावा बैठक घेतली तेव्हा महाडिक यांनी स्वाभाविकपणे उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. तेव्हा पक्षाचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, माजी अध्यक्ष राजू लाटकर या मुश्रीफ समर्थकांनी महाडिक यांच्या उमेदवारीस खो घातला.

त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले की त्यांना हमखास महाडिक यांची उमेदवारी आणि त्याला होणार विरोध यावरून विचारले जात असे. त्यावर नेतेही सर्वच पक्षात वाद असतो, हा वाद चर्चेतून संपवला जाईल असे स्पष्टीकरण करून वेळ मारून नेताना दिसले.

विद्यमान खासदाराला सहसा डावलले जात नाही. तसे करायचे असल्यास कारणही तितके भक्कम असावे लागते. संसदीय कामकाज, विकासकामे, जनसंपर्क, प्रतिमा संवर्धन याही बाबतीत महाडिक यांना विरोध व्हावा असे चित्र नाही. पण पक्षासाठी त्यांनी केले काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाडिक यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, आणि त्यांनाच महाडिक यांनी वाऱ्यावर सोडले असा आक्षेप आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत की कधी पक्षाचे संघटन करून भक्कम बांधणी व्हावी यासाठी प्रयत्न केले नाहीत, असे आक्षेप हसन मुश्रीफ आणि संध्यादेवी कुपेकर या आमदारांनी मुंबईतील बैठकीवेळी निदर्शनास आणले. यावर महाडिक यांचे समर्थन असे कि, माझ्या विजयात सर्वपक्षीयांचे योगदान असल्याने स्थानिक निवडणुकांत कोणा एकाची बाजू घेतली असती तर अन्यांना दुखावल्यासारखे झाले असते. त्यामुळे मी तटस्थ राहिलो पण पक्षविरोधी काम केलेले नाही. केलेल्या कामाच्या जीवावर विजय शक्य आहे, असा त्यांचा  दावा आहे. आता या आरोप-प्रत्यारोपात कोणाची बाजू सरस ठरते हे लक्षवेधी बनले आहे.

धनंजय महाडिक यांच्याबाबत आक्षेप

१ महाडिक यांच्या विरोधाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांची निष्ठा. दिल्लीत ते पवारांशी निष्ठा वाहतात. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधतात आणि कोल्हापुरात आल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सौहार्दाचे संबंध आहेत.

२ असा एक जोरदार आक्षेप विरोधक नोंदवतात. त्यांचे काका महादेवराव महाडिक यांनी पुत्र आणि स्नुषा यांना भाजपचे आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष केले.

३ यावेळी पुतण्याने काकांना पडद्याआडून मदत करताना पक्षाचे नुकसान केले, अशी मांडणी केली जाते.  प्रासंगिक निमित्ताने मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या गाठीभेटी होतात याचा अर्थ आपली भाजपशी कसलीही जवळीक आहे असा अर्थ काढण्यात हशील नाही,’ असे समर्थन महाडिक करतात.

४ मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यांशी असलेल्या जवळिकीतून ते लोकसभेला कमळ  चिन्हावर उभे असल्याचे दिसतील, असेही सांगत विरोधक महाडिक यांना भाजपच्या छावणीत नेवून सोडतात. इथे मात्र एक मजेशीर विरोधाभास आहे.

५ महाडिक यांना भाजपच्या गोटात राष्ट्रवादीचे विरोधक सोडत असताना तिकडे शिवसेनेचे गतवेळचे उमेदवार पश्चिम महाराष्ट्र सहप्रमुख संजय मंडलिक यांच्यावर ते शिवसेनेपेक्षा उभय काँग्रेसशी सलगी ठेवून असल्याचा आक्षेप रविवारी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पक्षाच्या बैठकीत उघडपणे नोंदवला.

६ महाडिक यांचे विरोधक हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांचे दोन वर्षांत जमलेले गुळपीठ याची साक्ष काढली जात आहे.

Story img Loader