गाढवांऐवजी ट्रॅक्टर ट्रॉलीने ओझी वाहण्याचे काम
तंत्र युगाचा आरंभ होऊन प्रदीर्घ काळ उलटला, तरी अद्यापही पारंपरिक पद्धतीने कामाचा उरक आजही केला जातो. अशाच प्रकारे गाढवाकरवी ओझी वाहण्याचे काम करणारा बेलदार समाज आता कात टाकून नव्या तंत्राधारे काम करण्यास सज्ज झाला आहे. शाहूराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर येथील बेलदार समाजाने हा निर्णय घेतला असून आता त्यांनी ‘ट्रॅक्टर ट्रॉली’द्वारा ओझी वाहण्याचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. ‘अॅनिमल राहत’ या प्राणिमित्र संघटनेच्या प्रयत्नाने या उपक्रमाचा नुकताच प्रारंभ झाला असून या निमित्ताने बारमाही कामाची हमी मिळाल्याने बेलदार समाज आणि कष्टातून मुक्तता मिळालेल्या गाढवानांही ‘अच्छे दिन’ पाहायला मिळत आहेत.
बेलदार हा एक भटका समाज आहे. डोंगर फोडून बांधकामासाठी दगड आणण्याचे काम हा समाज वर्षांनुवष्रे करत आला आहे. अलीकडे वीटभट्टीवर विविध प्रकारची कामे करण्याकडे यांचा कल आहे. अर्थात या कामासाठी त्यांच्या समवेत सदैव असलेले गाढव हमखास कामी येते. पण या गाढवांचे संगोपन ही याच नव्हे तर अन्य समाजाची डोकेदुखी बनली आहे. गाढवांना गोठय़ात बंदिस्त ठेवता येत नाही.
मोकळे सोडायचे तर त्याच्यामुळे अपघात होण्याच्या तक्रारी येतात. अनेकदा अपघातात गाढवाचा मृत्यू झाला, की बेलदार समाजाला उपजीविकेला मुकावे लागते. या विचित्र कोंडीत बेलदार समाज अडकला असताना त्यांना ‘अॅनिमल राहत’च्या रूपाने आशेचा किरण सापडला. ही संस्था गाढव, घोडा, बल अशा जखमी जनावरांच्या उपचाराचे काम करते. या जनावरांची ओझ्यातून मुक्तता व्हावी, यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांची धडपड असते.
बेलदार समाजाची अडचण त्यांनी जाणली आणि बेलदार बांधव आणि त्यांच्याकडील गाढव यांच्या श्रममुक्तीचा मार्ग त्यांनी तयार केला.
व्याप्ती वाढवणार
याबाबत ‘अॅनिमल राहत’ संस्थेचे कम्युनिटी डेव्हलपमेंट मॅनेजर शशिकर भारद्वाज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, की बेलदार समाजाला काम करण्याच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढण्याचे काम आम्ही केले आहे. नव्या तंत्राचा स्वीकार करण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. या समाजातील आणखी काही लोकांना याच मार्गावरून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गाढवाच्या बदल्यात ट्रॅक्टर
‘अॅनिमल राहत’ या संस्थेने बेलदार समाजापुढे एक प्रस्ताव ठेवला. बेलदार समाजाचे श्रम दूर करण्यासाठी त्यांना मोफत ट्रॅक्टर देण्यात येईल. त्यासाठी लागणारी ट्रॉली त्यांनी खरेदी करावी. गाढवाला कायमची श्रममुक्ती मिळण्यासाठी त्याला संस्था घेऊन जाणार. याला समाजाने होकार दिला. त्यानुसार अमेरिकेतील ‘पिटा’ संस्थेच्या संस्थापिका इन्ग्रिड न्यूकर्क यांच्या हस्ते सुनील चव्हाण या युवकाला पहिला ट्रॅक्टर जयसिंगपूर येथे देण्यात आला.
समाजाला हितकारी
बेलदार समाज फारसा शिकलेला नाही. प्रत्येकाच्या घरी १०-१५ गाढवे आहेत. त्यांची निगा ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशावेळी ‘अॅनिमल राहत’ने राबलेला उपक्रम समाजाला पुढे घेऊन जाणारा असून त्यात समाजाचे सर्वागाने भले होणार आहे. राज्यात विविध ठिकाणी राहणाऱ्या समाजातील अन्य लोकापर्यंत हे काम पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे या उपक्रमाला चालना देणारे समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.