कोल्हापूर : विविध प्रकारचे दररोज एक कोटीहून अधिक मीटर दर्जेदार कापड विणणारे इचलकरंजीचे केंद्र हे राजधानी नवी दिल्ली येथे भरलेल्या ‘भारत टेक्स’ या आंतरराष्ट्रीय कापड प्रदर्शनात आपल्या कामगिरीमुळे लक्षवेधी ठरले. जगभरातून आलेल्या विविध वस्त्रोद्योजकांमध्ये इचलकरंजीतील २५ स्टॉल जगभरातील कापड खरेदीदारांचे आकर्षण बनले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इचलकरंजी पॅव्हेलियन’ला भेट देऊन प्रशंसा केली असल्याने उद्योजकांचाही हुरूप वाढला आहे.
अलीकडे नवी दिल्ली येथे ‘भारत टेक्स’ या नावाने आंतरराष्ट्रीय कापड प्रदर्शनाचे आयोजन भारत मंडपम् येथे केले जाते. या वर्षीच्या प्रदर्शनालाही जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याही प्रदर्शनात इचलकरंजीतील उद्योजकांचा सहभाग असून, त्यासाठी खास ‘इचलकरंजी पॅव्हेलियन’ नावाने स्वंतत्र दालन उभे केले आहे. खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले.
इचलकरंजीमध्ये दररोज शर्टिंग, सूटिंग, साड्या, फॉल्स तसेच टेक्निकल टेक्सटाइल कापडाचे एक कोटी मीटर उत्पादन होते. देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रात इचलकरंजीत उत्पादित कापड वापरले तर जातेच खेरीज, ते थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत असते. शहरात अत्याधुनिक मानले जाणारे एअरजेट् १५ हजार, रेपियर्स ३ हजार, ऑटो लूम ४ हजार आणि साधे यंत्रमाग ६० हजार आहेत. महाराष्ट्रातील उदयोन्मुख वस्त्रोद्योग केंद्र असलेल्या इचलकरंजीतील उद्योजकांनी या प्रदर्शन दर्जेदार, वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक कापडाचे सादरीकरण केले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत प्रभावी ठसा, मजबूत पकड असलेले इचलकरंजीने अलीकडे निर्यात बाजारपेठेत आपली मुद्रा उमटवली आहे. येथील वैविध्यपूर्ण कापड निर्मितीमुळे ‘ब्रँड इचलकरंजी’कडे पाऊल पडू लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय व्यापार मंत्री पियूष गोयल यांनीही ‘इचलकरंजी पॅव्हेलियन’ला भेट देऊन वस्त्रोद्योजकांची प्रशंसा केली. याशिवाय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह हे इचलकरंजीच्या वस्त्र उत्पादनांची श्रेणी पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी मार्चमध्ये इचलकरंजीच्या भेट देण्याचे मान्य केले आहे.
इचलकरंजीतील वस्त्र निर्मिती कंपन्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कापडाचे उत्पादन करत आहेत. निर्यात बाजारपेठेत प्रवेश केला असून, लवकरच तेथे प्रभावी ठसा उमटवतील असे इचलकरंजी पॅव्हेलियन मध्ये सहभाग नोंदवलेले इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल, माजी अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी सांगितले.
इचलकरंजी पॅव्हेलियन या स्वंतत्र दालनाद्वारे इचलकरंजी शहराने आपली कापड निर्मितीची ओळख आणखी दृढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आदींनी या दालनाला भेट देऊन वस्त्र उद्योजक, व्यापारी यांच्याशी संवाद साधून प्रगतीची माहिती घेतली आहे. याचा उद्योग संवर्धन, निर्यात वाढीसाठी निश्चितपणे लाभ होईल.
प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री.
आम्ही अत्याधुनिक शटललेस मागासह अन्य प्रकारच्या मागावर निरनिराळ्या प्रकारची वस्त्र निर्मिती करतो. या प्रदर्शनातून जगाची बाजारपेठ अधिक खुली होत आहे. इचलकरंजी ब्रॅन्ड जगाला समजला. यातून निर्यातीच्या नव्या ऑर्डर मिळतील, असे आशादायक वातावरण आहे.
गजानन होगाडे, संचालक, पीडीक्सेल (पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड प्रमोशन कौन्सिल)