एसटीला बाजू देत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एस.टी.च्या मागील चाकाखाली सापडून युवक जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी इचलकरंजी टेलिफोन ऑफिस इचलकरंजीजवळ ही दुर्घटना घडली. प्रवीण राजेंद्र दोशी (वय २२, रा. श्रीपादनगर, इचलकरंजी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
प्रवीण दोशी हा आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच ०९ सीवाय १२१७) वरून शिवाजी पुतळ्याकडून संभाजी चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी कर्नाटक आगाराची चिकोडीला निघालेली एस.टी. (क्र. केए २३ एफ ५२८) जात होती. टेलिफोन ऑफिसजवळ एस.टी. मोटरसायकलला ओव्हरटेक करून पुढे जात होती. त्यावेळी प्रवीणने एस.टी.ला बाजू देत मोटरसायकल रस्त्याकडेला घेतली. पण त्याठिकाणी रस्त्यावर पसरलेल्या बारीक खडीवरून त्याची मोटरसायकल घसरली. त्यामुळे तोल जाऊन प्रवीण एस. टी.च्या बाजूला पडला. तो थेट मागील चाकाजवळच पडल्यामुळे एस. टी. च्या मागील चाकाखाली पडला. डोक्यावरूनच एस. टी. चे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. एस. टी. चालकास काही तरी धडकल्याचे लक्षात आल्याने त्याने तात्काळ एस. टी. थांबवून तेथून पलायन केले.
घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले. पण घटनास्थळाचे मोबाईलवर चित्रीकरण आणि फोटो घेण्यासाठी तरुणांची घाईगडबड सुरू होती. त्याचा पोलिसांना पंचनामा करताना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे पोलिसांनी सौम्य छडीमार करून जमावाला पांगवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोशी याच्या नातेवाईकांसह त्याच्या मित्रमंडळींनी आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.