कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणूक भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार असून विद्यमान खासदारांना त्यांच्या जागा सोडण्यात येईल असे संकेत आहेत. तथापि भाजपने कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीपैकी एका मतदारसंघावर दावा केल्याने ही मागणी राजकीयदृष्ट्या चर्चेत आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन पैकी एक जागा कमळ चिन्हावर लढवली गेली पाहिजे. तशी मागणी भाजपकडे करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात घरोघरी गॅस योजनेच्या माध्यमातून ७०० कुटुंबांना गॅस पुरवठा झाला आहे. मजले येथे ड्रायपोर्ट उभारण्यास केंद्राची तत्वता मान्यता मिळाली आहे. विविध प्रकारचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, पायाभूत सुविधा, ग्रामसडक योजना आदीसाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे, असे हाळवणकर म्हणाले,
शेट्टी खरे बोलले
खासदार धैर्यशील माने यांचे गाव असलेल्या रूकडी येथे रेल्वे उड्डाण पुलाचे काम होण्यासाठी मी आमदार असताना तसेच तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांची भेट घेऊन केला होता. गडकरी यांनी या पुलाचे ऑनलाईन उद्घाटन केले असताना माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने आदींनी पुन्हा उद्घाटन करण्याचा आताताईपणा कशाला केला, असा उल्लेख करीत हाळवणकर यांनी शेट्टी खरे बोलले असल्याचे सांगून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
३ हजार लाभार्थ्यांना मंजुरी
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत नवीन ३ हजार लाभार्थी लाभार्थ्यांची वर्षभर प्रश्न प्रलंबित असणारी प्रकरणे निकालात निघाली आहेत. या मंजुरी पत्रांचे वाटपाचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी दिली.