सत्ताधारी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. कामगार, महिला, दलित, सामान्य जनता यांच्या विरोधात असलेली शक्ती पुन्हा उभी राहू द्यायची नाही. त्यासाठी आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून लढावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केले. येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मेळाव्यात पवार यांनी केंद्र व राज्य शासनाची कामगिरी अपयशी ठरल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शेतकरी वेदनेत, कामगार कष्टात, उद्योग बंद आहेत. सत्ता कोणासाठी राबवली जात आहे हे कळत नाही. त्यामुळे अच्छे दिन हेच का, असा प्रश्न पडत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आजच्या शाहू जयंती दिनाचा संदर्भ देत पवार म्हणले, दुष्काळ पडला असताना शाहू महाराजांनी पाहणी करून मदत केली. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनीही दुष्काळात जनतेला दिलासा दिला. पण राज्य दुष्काळात होरपळत असताना मोदी अमेरिकेत जाऊन ओबामांच्या हाती बळेच हात गुंतवत आहेत. त्यांनी जरूर जगभर दौरे करावेत पण त्याआधी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखून त्यांना मदत करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांचे रणिशग फुंकल्याची घोषणा करून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवारांचे प्रगल्भ नेतृत्व लाभले असल्याने आपल्याला जातीयवादी शक्ती रोखता येणे शक्य असल्याचा दावा केला. आमदार हसन मुश्रीफ यांनी आगामी निवणुकीत तरुणांना अधिक संधी देऊन पक्षाला यश मिळवून देणार असल्याचे सांगितले. संसदेतील प्रभावी कामगिरीचे श्रेय शरद पवार यांना देताना खासदार धनंजय महाडिक यांनी मुलींची छेड काढणाऱ्यांना दांडके हाती घेऊन चोप देण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली. निवेदिता माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा