कोल्हापूर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या अभेद्य गडाला तडे देत भक्कमपणे उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस जराजर्जर होऊ लागली आहे. नगरपालिका निवडणुकीत या पक्षाचा कमकुवतपणाचा लाभ उठवत भाजपने केलेला शिरकाव घडय़ाळाचे काटे उलटे फिरू लागल्याचे संदेश देणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद, लोकप्रतिनिधी – पदाधिकाऱ्यांनी प्रचारापासून दूर ठेवलेले अंतर, संघटनात्मक बांधणीचा अभाव, दलित – मुस्लिम या पारंपरिक मतपेढीने घेतलेली फारकत अशा अनेक कारणांचा परिपाक म्हणजे पक्षाला अपयशाच्या वाटेने जावे लागले. याउलट, भाजपने हे सारे दोष दूर करीत राष्ट्रवादीच्या गडाला धक्का देऊन आपला झेंडा रोवला.
शेकापला उतरती कळा लागल्यावर सहकारी क्षेत्राच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकछत्री अंमल राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर अनेक मातब्बरांनी हातावर घडय़ाळ बांधणे पसंत केले. पुढे पक्षाची ताकद वाढत गेली. दोन खासदार , दोन-दोन मंत्री, सर्वाधिक आमदार निवडून येत. जिल्हा बँक, बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. पण, पक्षांतर्गत मतभेदाने हळूहळू संघटन खिळखिळे होत गेले. सदाशिव मंडलिक-हसन मुश्रीफ यांच्यातील वादाने जिल्ह्य़ात पक्षाचे नुकसान झाले. शहरातही फार काही वेगळे चित्र राहिले नाही.
शरद पवार यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे सदाशिवराव मंडलिक दुरावले गेले. अजित पवारांच्या नीतीमुळे दिग्विजय खानविलकर दुखावले गेले. मडलिकांच्या जागी लोकसभेला धनंजय महाडिक निवडून आले. पण, ते ना कोल्हापूर महापालिकेच्या प्रचारात होते ना नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत. माजी खासदार निवेदिता माने या तर इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या ताराराणी आघाडीच्या एका उमेदवाराचा प्रचार करण्यात पुढे होत्या , तर त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य धर्यशील हे भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे समर्थन करीत होते.
कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पक्षाचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. जिल्हा सांभाळणे राहिले दूर , उलट कागल हा स्वत:चा मतदारसंघ सांभाळताना आमदार हसन मुश्रीफ यांचा पार घाम निघाला. गडिहग्लज, मुरगूड या मुश्रीफांच्या मतदारसंघातील पालिकेत उतरती कळा प्राप्त झाली . जयसिंगपूर पालिकेत अध्यक्षपद विरोधकांकडे गेले. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बेदिली माजली असताना मुश्रीफ यांचे सोबती आपल्याकडे वळवण्याची चाल भाजपने नेटकेपणाने खेळली. कागलमध्ये शाहू महाराजांच्या घरातील समरजितसिंग घाटगे आणि वारणा खोऱ्यातील माजी मंत्री विनय कोरे यांना आपल्या बाजूला जोडण्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यशस्वी ठरले. परिणामी कागल पालिकेत कमळ फुलले, तर कोरेंमुळे पन्हाळा व मलकापूर पालिका ताब्यात आल्या. कोरेंची साथ लाभल्याने लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळविण्यात भाजपला यश आले. मुश्रीफ सोडले तर बाकीचे लोकप्रतिनिधी – पदाधिकारी केवळ नामधारी राहिल्याने पालिका निवडणुकीत घडय़ाळाची टिकटिक मंदावली. याचा फायदा घेत भाजपने कमळाच्या पाकळ्या अलगदपणे खुलल्या.
गेल्या वर्षी महानगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. तेव्हा पक्षाने सारी ताकद पणाला लावूनही काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. यापाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसला आहे.
चंद्रकांतदादांची उत्तम रणनीती
कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद मिळाल्यापासून भाजपची ताकद वाढविण्यावर दादांनी भर दिला. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला शह देण्याकरिता महादेव महाडिकांच्या मागे ताकद लावली, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. कोल्हापूर महानगरपालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढली. नगरपालिका निवडणुकीत इचलकरंजी आणि वडगाव या दोन नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपने हळुवारपणे जिल्ह्य़ात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.