कोल्हापूर : राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेत काहीच नवीन नाही. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत यात्रा काढली होती. तरीही तीन राज्यात त्यांचा दारुण पराभव झाला. या यात्रेमुळे जी काही राज्ये शिल्लक आहेत ती सुद्धा जातील,अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीचे सरकार येवो अशी प्रार्थना मी केली,असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> अदानी उद्योग समूहाला धरणातून पाणी दिल्यास प्रकल्प जनआंदोलनाद्वारे हाणून पाडू; राजू शेट्टी यांचा इशारा
यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, बारामती ऍग्रो कारखान्यावर छापा पडणे यात मला नवीन काही वाटत नाही. अनेक लोकांवर कर चुकवेगिरी केल्याचा ठपका आहे. मनी लाँडरिंगचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाई कशासाठी करण्यात आली त्याचा तपशील माझ्याकडे नाही.
राजाराम कारखाना कार्यकारी संचालक मारहाण प्रकरणी ते म्हणाले, सहकार क्षेत्रातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला मारहाण करणे योग्य नाही. कोणी कायदा हातात घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जितेंद्र आव्हाड हे चुकीची विधान करून प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.आव्हाडांच्या पक्षातल्या अध्यक्षांनी आव्हाडांचा राजीनामा घेतला पाहिजे.त्यांना पक्षातून बडतर्फ केले पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.