कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाट्याला गेले आहे. तरीही भाजपने येथे लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे. जागा वाटपाच्या अंतिम चर्चेनुसार ज्यांच्याकडे हे मतदारसंघ येतील त्यांना भाजपच्या तयारीचा फायदा होईल, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १० फेब्रुवारी रोजीच्या दौऱ्यानिमित्त कार्यक्रम स्थळाची पाहणी चंद्रकांत पाटील, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राहुल चिकोडे, महेश जाधव विजय खाडे पाटील आधी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाबाबत माझी एक बैठक शिंदे गटासोबत झाली आहे. एका बैठकीत सगळे विषय संपतील असे नाही. नजीकच्या काळात बैठक घेऊन जागा वाटपाचे सर्व प्रश्न कशाप्रकारे सुटतील हे पाहता येईल. भाजप शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे.
परीक्षेत अडचण नाही
राज्यातील विद्यापीठ आणि दहावी बारावीच्या परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही. या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरेडले जावेत असा आमचा उद्देश नाही. आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू, असेही मंत्री पाटील म्हणाले.
अमित शहा यांचा दौरा महालक्ष्मीचे दर्शन, छ. शिवाजी महाराज – शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन, न्यू एज्युकेशन सोसायटी शताब्दी महोत्सव सोहळा, भाजपच्या नूतन कार्यालयातील गणेश मंदिराचा पायाभरणी, भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद, लोकसभा निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा व प्रयाण.