स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांचे नाव ‘क्रिकेट बेटिंग’ प्रकरणात निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात जनारोष वाढत आहे. या प्रकरणी जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने उद्या मंगळवारी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहरासह जिल्हय़ामध्ये बेटिंगचा प्रभाव वाढत चालला आहे. बेटिंगने धुमाकूळ घातल्याने हजारो लोक या जाळय़ात सापडत आहेत. या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी छापा टाकलाय त्यामध्ये बेटिंग घेणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्याकरिता आपण बेटिंग घेत असल्याचे कबूल केले होते. यापूर्वीही जाधव यांच्यावर बेटिंगप्रकरणी कारवाई झाली होती. पुन:पुन्हा जाधव यांचे नाव बेटिंगमध्ये येऊ लागल्याने त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांनी सांगितले होते. लोकप्रतिनिधींकडूनच काळे धंदे सुरू राहिल्यास लोकांनी कोणता आदर्श घ्यायचा असा प्रश्न करीत त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर याच मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने मंगळवारी आयुक्त यांची भेट घेऊन जाधव यांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली जाणार असून, महापालिकेसमोर सकाळी ११वा निदर्शने करण्यात येणार आहेत.