केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळेच कोल्हापूर शहराचा सर्वागीण विकास होण्यासाठी महापालिकेत भाजप-ताराराणी युतीचा महापौर करण्याचा आटापिटा आम्ही करत आहे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना मंगळवारी लगावला. तसेच आघाडीचे ३२ नगरसेवक सोडून उर्वरित सर्व नगरसेवकांनी भाजप ताराराणीच्या महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारांना पािठबा द्यावा, असे आवाहन केले. या वेळी भाजप ताराराणीसोबत युती करण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट करत येत्या १६ तारखेला भाजप ताराराणीचाच महापौर होणार असल्याचे सांगितले.
भाजप ताराराणीच्या महापौर, उपमहापौरपदाच्या मुलाखती मंगळवारी पार पडल्या. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माजी मंत्री सतेज पाटील हे काही साधे नाहीत. आज त्यांनी सर्व नगरसेवकांना मिठाईचे बॉक्स वाटले आहेत. त्यांच्या सर्व बारीकसारीक हालचालींवर सर्वानीच लक्ष ठेवणे गरजेचे असून, शहरात खुट्ट जरी झाले तरी मला सांगावे असे आवाहन त्यांनी केले.
सतेज पाटील यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना मंत्री पाटील म्हणाले, आम्हाला महापालिकेत घोडेबाजार करायचा नाही. धाकदपटशाही, प्रलोभन, घोडेबाजार करून आम्ही सत्ता मिळवणार नाही. महापौरपदाचा अट्टहास हा केवळ कोल्हापूरच्या सर्वागीण व सुसूत्र विकासासाठीच आहे, पण तुमचा महापौरपदाचा आटापिटा का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

Story img Loader