केंद्र व राज्यातील सत्ता प्राप्त केल्यानंतर भाजपने कोल्हापूर जिल्ह्य़ातील नगरपालिका काबीज करण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे. यानिमित्ताने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्य़ातील साखर-सहकारसम्राट यांच्यातील कडवा संघर्ष प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रंगतदार बनला आहे. जिल्ह्य़ातील सर्व नऊ नगरपालिकांवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून येण्याच्या दृष्टीने पाटील यांचे लक्ष आहे. तर नागरी भागातील आपले वर्चस्व कायम राहावे यासाठी सहकारसम्राट कोठेही कमी पडताना दिसत नसल्याने चुरशीचा सामना आहे.
केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर भाजपने नगर परिषदा व ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजपने या दृष्टीने आपली पावले टाकताना बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांची सासुरवाडी असल्याने या जिल्ह्य़ात पक्षाचा प्रभाव वाढला पाहिजे, हा पाटील यांचा प्रयत्न आहे. संभाजीराजे छत्रपती व समरजितसिंह घाटगे या दोघा मातबरांना भाजपच्या छताखाली आणण्यात महत्त्वाची भूमिका पाटील यांनी बजाविली. त्यानंतर त्यांनी सर्व नऊ नगरपालिकांमध्ये बेरजेचे राजकारण कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित केले. त्या त्या नगरपालिकेत प्रस्थापितांच्या विरोधात असणाऱ्या गटांना जवळ केले. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनाही भाजपने आपलेसे केले.
इचलकरंजीत लक्षवेधी लढत
सर्वात श्रीमंत, मोठय़ा अशा इचलकरंजी नगरपालिकेत राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी (राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस) यांना भाजपने जवळ करून त्यांच्या पत्नी अॅड. अलका स्वामी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत बेरजेचे राजकारण साधले. ताराराणी व मँचेस्टर आघाडी यांना आपल्या गोटात आणून याचेच पुढचे पाऊल भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी टाकत ही पालिका जिंकण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत. भाजपचे हे प्रयत्न लक्षात घेऊन काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक जांभळे, प्रदेश सचिव मदन कारंडे यांनी एकत्रित येऊन आपला गडावरील तिरंगा फडकता राहण्यासाठी कंबर कसली आहे.
महत्त्वाचे मोहरे लक्ष्य
- राज्यात भाजप-शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचे ठरवले असले तरी जिल्ह्य़ातील चित्र या तत्त्वापासून फारकत घेणारे आहे. प्रमुख विरोधी नेता म्हणून ओळखले जाणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना भाजपने लक्ष्य करण्यासाठी समरजितसिंह घाटगे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय मंडलिक यांना एकत्रित केले.
- याद्वारे मुश्रीफ यांना एकाकी पाडून त्यांचा कागल हा बालेकिल्ला हस्तगत करण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण मुश्रीफ यांनीही चालीला प्रतिचाल देत आपल्या विरोधात बहुरंगी लढत होण्यासाठी फासे टाकले आहेत. तर कागल तालुक्यातील मुरगुड या पालिकेत प्रवीणसिंह पाटील गटाला जवळ करून त्यांनीही बेरजेच्या राजकारणाने प्रत्युत्तर दिले आहे.