कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा भाजप निश्चितच जिंकेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केला. भाजपाच्या नूतनीकरण केलेल्या इचलकरंजी शहर कार्यालयास मंत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून मंत्री पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची पुष्प वर्षांवात जल्लोषी रॅली काढण्यात आली. यावेळी नुकत्याच निवडी झालेल्या नवनिर्वाचित शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले व जिल्हा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की आगामी वर्ष हे निवडणूकांचे वर्ष आहे. सर्वच सर्वेक्षणात भाजपा आणि मित्रपक्षांना ३२५ पेक्षा अधिक जागा मिळतील असे दाखविण्यात आले आहे. तरीदेखील नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागांचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र झालेल्या नेत्यांच्या ट्रेनला ना ड्रायव्हर आहे ना गार्ड आहे.
वस्त्रोद्योग आणि सूत गिरण्यांसाठी शासन सकारात्मक असून लवकरच शासन लवकरच चांगले निर्णय घेईल. राज्यातील चारही गटांना अनुदानात वाढ, यंत्रमागधारकांना वीज सवलत कायम, प्रती युनिट १ रुपया वीजबिल याचबरोबर अन्य काही निर्णय लवकरच घेतले जातील, असेही पाटील यांनी नमूद केले. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.