कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा शिंदे गटाला देण्याचे वरच्या पातळीवर ठरले आहे, असा निर्वाळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देऊन या दोन्ही जागा महायुती निश्चितपणे जिंकेल, असे रविवारी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झाला आहे. देशाची प्रगतीची गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा निर्धार करावा.
हेही वाचा – कोल्हापूर : मशिद संचालक मंडळाच्या वादातून तलवार हल्ला; एकजण गंभीर जखमी
लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी मोट बांधली आहे. केवळ त्यांनी एकत्र येऊन चालणार नाही तर कार्यकर्त्यांच्या पातळीवरही एकत्र येऊन एकसंघपणे लढण्याचा संदेश सर्व कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. आपापसातील मतभेद दूर करून लोकसभा निवडणुकी जिंकण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक म्हणाले, यापूर्वीच्या सत्ता काळात वर्षानुवर्षे रस्ते, वीज, पाणी, गरीबी हटाव अशा घोषणा दिल्या पण त्या बाबतीत काहीच करता आले नाही. आता मात्र मोठी स्वप्न घेऊन ती सत्यात उतरवण्याइतकी ताकद देशाने कमावलेली आहे. प्रगती कायम ठेवण्यासाठी महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.
हेही वाचा – आर्थिक वादातून हॉटेल चालकाची गोळ्या झाडून हत्या; कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार
यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार तसेच के. पी. पाटील, सुरेश हाळवणकर,अमल महाडिक आदी माजी आमदार, समरजितसिंह घाटगे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.