कोल्हापूर : कुस्ती महासंघांचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हे दोषी असतील कडक कारवाई करावी. याप्रकरणी सरकारची भुमिका संशयास्पद वाटत आहे. कोल्हापूरसह राज्यातील पैलवानांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठिंब्यासाठी समोर यावे. या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटना एक पाऊल पुढे असेल, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांनी या लढ्यातील आपली भूमिका आज जाहीर केली.
गेल्या दोन महिन्यापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्ती खेळाडू जंतर मंतरवर आंदोलन करीत आहेत. राष्ट्रीय कुस्ती महासंघांचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्ती खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे. पण याबाबत सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला.
हेही वाचा >>> “आमच्या घराण्यात विश्वासघाताची…”, उदयनराजे भोसलेंची शरद पवारांवर टीका
या घटनेमुळे देशाची व विशेष करून कुस्ती क्षेत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली आहे. अन्याय झाल्यानंतर मदतीसाठी धावणारी व्यक्ती म्हणून पैलवान ओळखला जातो. तथापि या आंदोलनात पुरूष पैलवानांनी आपली भुमिका स्पष्ट केलेली दिसून येत नाही. कदाचित ब्रिजभूषण हे कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याविरोधात बोलण्याच धाडस कुणी करत नसावे. अन्याया विरोधात लढणारा हि आपली प्रतिमा सार्थ करण्यासाठी पैलवानांनी आपल्या महिला साथीदारांच्या पाठिशी खंबीरपणाने राहणे गरजेचे आहे. कोल्हापूरसह राज्यातील पैलवानांनी एकमुखाने या महिला कुस्तीपटूंच्या पाठिंब्यासाठी समोर यावे. या प्रश्नावर मी राष्ट्रपती यांच्याकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यापुढे या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्यासोबत एक पाऊल पुढे असेल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.