लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर शहरातील फुटबॉलचे प्रेम मान उंच करायला लावणारे असताना दुसरीकडे अति उत्साही प्रेक्षकांचा उपद्रव वाढत चालला आहे. यातूनच आज एका सामना वेळी पुन्हा एकदा शिवाजी स्टेडियम मध्ये चांगलाच राडा झाला. फुटबॉल शौकिनांच्या हुल्लडबाजीमुळे सामन्याचा नूर पालटला. पोलिसांना लाठीमार करून हुल्लडबाजांना पांगवण्याची वेळ आली. या सर्व प्रकारावर फुटबॉल प्रेमी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूरची क्रीडा प्रेम आगळच आहे. या नगरीत क्रिकेट , कुस्ती याच्या बरोबरीने फुटबॉल प्रेमींची संख्या ही अधिक आहे. किंबहुना पेठापेठामध्ये फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये एकच गर्दी होत असते. परंतु फुटबॉल खेळाचा आनंद घेण्याऐवजी त्यावर विरजण घालण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे यातून खेळ आणि कोल्हापूरच नाव मलिन होत आहे.
गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षा वतीने आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण- बंदरे, सिद्धेश साळोखे, दर्शन पाटील यांनी पूर्वाधात ३ – ० गोलनी वेताळमाळवर आघाडी मिळवली. उत्तरार्धात वेताळमाळची चांगलीच दमछाक झाली.
यातूनच वेताळमाळ आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली. प्रेक्षक गॅलरीत दोन्ही गटाचे समर्थक ऐकमेकांच्या अंगावर धावून जात होते. पाण्याच्या बाटल्या भिरकावून दिल्या जात होत्या. भर मैदानाचा बेदम मारहाण सुरू झाली. स्पर्धा संयोजकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला.
संपूर्ण वेळेत शिवाजी संघाने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गॅलरीतील वाद स्टेडियमच्या बाहेर पुन्हा उफाळला. सामना समता स्टेडियमच्या बाहेर दोन्ही संघाच्या ४० जणांच्या समर्थकांनी एकमेकांचा अंगावर धावून जात पुन्हा गोंधळ सुरू केला. यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठी करण्यास सुरुवात करत गर्दीला पांगवल मात्र या राड्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला.
फुटबॉलवेड्या कोल्हापुरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात फुटबॉल वरून समर्थकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात देखील पार पडलेल्या सामन्यात खेळाडूंमध्ये झालेल्या गोंधळानंतर काही खेळाडूंना फुटबॉल खेळण्यावर बंदी घालण्यात आली.मात्र तरीदेखील ठराविक काही खेळाडू आणि प्रेक्षकांमुळे फुटबॉल आणि कोल्हापूरचं नाव मलिन होत आहे. यामुळे केएसएने आता कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूरकरांकडून होत आहे.