प्रशासनाच्या डॉल्बीमुक्त उत्सवाला काही मंडळांनी ठेंगा दाखविला असला तरी प्रचंड उत्साह, बहुंताशी मंडळांनी डॉल्बीला केलेला बायबाय यामुळे वाद्यवृंदाचे संगीत यंदा बऱ्याच वर्षांने ऐकायला मिळाले. ढोलताशांच्या  दणदणाटात मिरजेची विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तासांनी सोमवारी दुपारी शांततेत पार पडली. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर आणि डॉल्बीचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत सर्वप्रथम गणेश विसर्जन करणाऱ्या पाच मंडळांचा पोलीसांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
मिरजेतील विसर्जन मिरवणुकीस रविवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. पहिला गणेश विसर्जनाचा मान नदीवेसच्या विठ्ठल चौकातील शिवाजी गणेश उत्सव मंडळाने पटकावला. काल सकाळी साडेअकरा वाजता गणेश तलावात या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दिवसभर उन्हाचा तडाखा जास्त असल्याने गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर काढण्यात आले नाहीत. मात्र सायंकाळी पाच वाजलेपासून अनेक मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला.
सायंकाळी सात वाजल्यापासून बहुसंख्य मंडळाच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या होत्या. झांज पथक, लेझीम याचबरोबर नाशिक ढोल हे यंदाच्या मिरवणुकीत होतेच, पण पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या कारवाईमुळे यंदा बहुसंख्य मंडळांनी डॉल्बीला फाटा देत बॅण्ड पथकांना सहभागी करून घेतले होते. यामुळे चौका-चौकात बॅण्ड पथकाची गाणी ऐकण्यासाठी गणेश भक्त गर्दी करीत होते. याशिवाय मोठय़ा प्रमाणात बॅन्जो पथकांनाही मानाचे स्थान मिळाले.
रात्री आठपासून अनेक मंडळांच्या मिरवणुका एकाच वेळी लक्ष्मी मार्केट परिसरात आल्यानंतर गणेश भक्तांची गर्दी वाढत गेली. या परिसरात १०० मीटरच्या परिसरात विश्वशांती, मराठा महासंघ, शिवसेना, िहदू एकता आंदोलन यांच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. प्रत्येक स्वागत कमानीच्या ठिकाणी मंडळाच्या श्रींना श्रीफळ व हार अर्पण करण्यात येत होता. तसेच महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उघडण्यात आला होता.
िहदू एकता आंदोलनाच्या स्वागत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, पांडुरंग कोरे यांच्यासह जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त अजिज कारचे, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी आदी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष परशुराम चोरगे, महादेव सातपुते, विजय िशदे, दत्ता भोकरे आदी कार्यकत्रे यावेळी उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीत १८५ मंडळे सहभागी झाली होती. यापकी १२० मंडळांच्या श्रींचे विसर्जन गणेश तलावात पहाटे साडेपाच वाजता संपले. उर्वरित २४ मंडळांच्या मूर्तीचे कृष्णा नदीत तर एका मूर्तीचे विहिरीत विसर्जन करण्यात आले. दुपारी दोन वाजता अंतिम मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. २१ फुटापर्यंत उंच असलेल्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदीपात्रात करण्यात आले. यासाठी महापालिकेने दोन क्रेनची व्यवस्था केली होती.
दरम्यान, मिरवणुकीत सर्वप्रथम गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्या मंडळांना पोलीस दलाच्यावतीने स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. तसेच मिरवणुकीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करीत डॉल्बीचा वापर करणाऱ्या मंडळांची नावे पोलिसांकडे असून या मंडळाच्या पदाधिकाऱ्यासह डॉल्बीचालकाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिरवणूक काळात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी स्वत: अधीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह तीन उपअधीक्षक, २५ पोलीस निरीक्षकांसह १ हजार जवान तनात करण्यात आले होते.
एका जवानाचा मृत्यू  
बंदोबस्तासाठी सहभागी झालेल्या विजय रंगराव पाटील वय ३८ या गृहरक्षक दलाच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलीस ठाण्यातच त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.