प्रचाराची सांगता शुक्रवारी होणार असून अखेरच्या दिवसासाठी अवघे आठ तास उरले असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी अवघा दिवस प्रचाराने तापला होता. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सारेच प्रचारात उतरल्याने दिवस प्रचारमय झाला होता.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी होणार आहे. प्रचारासाठी गुरुवार व शुक्रवार असे दोनच दिवस हाती राहिल्याने राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. शुक्रवारी प्रचाराला अर्धा दिवस मिळणार असल्याने उमेदवारांनी गुरुवारीच सारी शक्ती एकवटून प्रचार सुरू केला.
वाद्यांच्या गजरात अन् उमेदवारांच्या जयघोषात दिवसभर भागाभागात पदयात्रा निघाल्या होत्या. मतदारांना थेट भेटून मतदानासाठी आवाहन केले जात होते. सकाळी उद्यानांमध्ये भ्रमंतीला येणाऱ्या मंडळींपासून ते सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांपर्यंत सर्वाना गाठण्याचा प्रयत्न झाला. तर दुपारी महिलांचे मेळावे, हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून प्रचाराचे दान पदरी टाकण्याचे आवाहन करण्यात आले. मतदान प्रकियेत बालकांचा समावेश नसला तरी त्यांनी सहामाही परीक्षा सुरू असतानाही प्रचाराची धुरा वाहिली. गळ्यात स्कार्प अडकवत अन् खांद्यावर झेंडे घेत वानरसेनेची भटकंती कौतुकाचा विषय बनली होती. थेट उमेदवारांना भेटण्यावर भर दिल्याने प्रमुख नेते, सेलिब्रिटी यांच्या जाहीर सभा टाळण्यात आल्या.
सर्व पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींच्या सभा आवरल्याने त्यांच्या चित्रफिती प्रचारादरम्यान दाखवून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा कसोशिने प्रयत्न सुरू होता. शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रचार चालणार असल्याने अखेरच्या दिवसात तो कसे वळण घेतो, हेच आता लक्षवेधी ठरले आहे.

Story img Loader