कोल्हापूर : सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या करंजोशी (तालुका शाहूवाडी) येथील श्री राजर्षि शाहू अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर संस्थेच्या अध्यक्षांनी अनैसर्गिक अत्याचार केले. त्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचा लज्जास्पद प्रकार बुधवारी उघडकीस आला. शाहूवाडी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष संजय बळीराम लोकरे (आंबर्डे ता. शाहूवाडी) याला अटक केली आहे. याप्रकाराने शिक्षण दिनी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> कोल्हापुरात इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या
याबाबत पोलिसांनी सांगितले की, करंजोशी गावात राजर्षि शाहू करिअर अकॅडमी आहे. येथे पोलिस व सैन्य दलाचे प्रशिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये १५ वर्षीय पीडित बालक (रा.चाकन,ता.खेड,जि.पुणे ) हा दहावीच्या वर्गामध्ये शिकत आहे. २६ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता संजय लोकरे याने पीडित विद्यार्थ्याला आपल्या खोलीत बोलावून पायाचे मॉलीश करण्यास सांगितले. त्यानंतर लोकरे याने पीडित विद्यार्थ्यास शेजारी झोपवून घेऊन अनैसर्गिक अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितलेस तर ठार मारले जाईल,अशी धमकी दिली. सदरची घटना घडून अकरा दिवस उलडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार शाहुवाडी पोलीस ठाणे येथे लोकरे याच्या विरोधात भा.द़.वि.स.कलम 377,506,सह बाललैगिक अत्याचार अधिनियम 2012चे कलम 4,5(F),6,8,12,सह अनुसुचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम सन 1989 चा सुधारीत अधिनीयम 2015 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी जयकुमार सुर्यवंशी करीत आहेत.