धनादेशांना सर्वाधिक पसंती
जिल्हा बँकांवर घालण्यात आलेल्या र्निबधामुळे शेतकऱ्यांची आíथक कोंडी होत असली तरी शेतकरी धनादेशाचा वापर करून अडचणींवर मात करताना दिसू लागला आहे. धनादेशाचा वापर हा सर्वच व्यवहारांवर रामबाण उपाय नसला तरी शेतकरी नोटा निश्चलनीकरणाच्या निमित्ताने पहिल्यांदा ‘कॅशलेस’च्या मार्गाने जाऊ लागला आहे. इतिहासजमा झालेल्या वस्तू विनिमय पद्धतीला किरकोळ प्रमाणात चालना मिळताना पाहायला मिळत आहे.
नोटा बदलाच्या निर्णयाने ग्रामीण भाग ढवळून निघाला. विशेषत: शेतकऱ्यांच्या व्यवहाराला मोठय़ा प्रमाणात आळा बसला. बहुतेक शेतकऱ्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये आणि नेमक्या याच बँकेवर शासन व रिझव्र्ह बँकेने र्निबध घातले . यामुळे शेतकऱ्यांना ना पसे भरता येतात ना काढता येतात. या विचित्र कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांची पराकोटीची परवड गेला महिनाभर होत आहे. दूध – उसाची कोट्यवधीची देयके बँकेतील खात्यावर जमा झालीत खरी, पण बँकेत रोकड मिळत नसल्याने चारा, खत, बियाणे, पशुखाद्य, किराणा माल वगरे देणी द्यायची कशी, याचा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या अडचणींवर धनादेशाचे व्यवहार हा नामी मार्ग शेतकऱ्यांना सापडला आहे. त्याचा कित्ता गिरवत शेतकरी शिक्षण शुल्क, वैद्यकीय देयके,अन्य देणी, खत, बियाणे , पशुखाद्य , किराणा माल अशा व्यवहाराच्या ठिकाणी धनादेश वापरत आहेत . त्यातून शेतकरी काही चांगल्या गोष्टी शिकू लागला असून त्यामध्ये धनादेशाचा वापर ही पहिली पायरी आहे. सर्वच व्यवहार रोकड पैशाद्वारे करण्याचा आजवरचा शेतकऱ्यांचा परिपाठ. आता त्यात काही प्रमाणात का असेना पण बदल घडतो आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे यांनी, नोटा बंदीचा त्रास शेतकऱ्यांना होत असला तरी आता धनादेशाचा वापर करून तो संकटावर मात करतानाच कॅशलेस व्यवहार करू लागल्याचे सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य केली आहे. मात्र , शेतकऱ्यांच्या एकूण व्यवहाराच्या घटकांचा विचार करता धनादेश हा पर्याय अत्यंत तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आपल्याकडील वस्तू दुसऱ्याला देऊन त्याच्याकडील वस्तू घेण्याचा पद्धतीला अर्थशास्त्रात वस्तू विनिमय म्हटले जाते. काही शेतकरी आपल्याजवळील धान्य स्वरूपातील माल किराणा दुकानदाराला वजन करून देऊन धान्याच्या रक्कमेच्या पटीत आपल्याला आवश्यक असणाऱ्या किराणा सामानाच्या वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. त्याशिवाय दुकानदार आपल्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला शेतकऱ्यांकडून घेऊन त्या बदल्यातही काही प्रमाणात किराणा सामान देत आहेत.