त्याचे वय अवघे एकोणीस. दहावी परीक्षेत त्याने ९४.६० टक्के गुण कमवलेले. अत्यंत हुशार म्हणून गणला जाणारा हा विद्यार्थी शुक्रवारी सराईतपणे घरफोडय़ा आणि मोटारसायकली चोरत असल्याचे उघडकीस आले. चनीच्या उद्देशाने तो चोऱ्या करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अवधूत ईश्वरा पाटील असे या तरुणाचे नाव आहे. आजवर त्याने १० घरफोडय़ा केल्या तर २ दुचाकीही चोरल्या आहेत.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि हुशार असलेला अवधूत मूळचा भूदरगड तालुक्यातील देऊळवाडी येथील. आई अंगणवाडी शिक्षिका, तर मोठा भाऊ सत्यवंत हा पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसेच त्याची बहीणही बीएस्सी झाली आहे. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३०० पैकी २९८ गुण मिळवून अवधूतने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.
दहावीमध्ये अवधूतने ९४.६० टक्के गुण मिळवून आपली बौद्धिक चमक दाखवून दिली होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून कोल्हापुरातल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दाखल झाला. त्याच्याकडे असणारा मोबाइल कोणीतरी चोरल्याने रागापोटी त्याने चोऱ्या करण्यास सुरुवात केली आणि पुढे तो गुन्हेगारी जगताकडे ओढला गेला.
चोरलेल्या वस्तू विकून त्याच्या हाती पैसा खेळू लागल्याने त्याला अभ्यासाऐवजी घरफोडय़ातच गोडी वाटू लागली. त्याच्यावर गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० घरफोडींचे गुन्हे दाखल झाले. तसेच गोवा आणि सावंतवाडी येथे २ दुचाकी चोरीप्रकरणीही गुन्हा दाखल झाला असून हे सर्व गुन्हे नुकतेच उघडकीस आले आहेत. अवधूतकडून आतापर्यंत चोरीस गेलेला ११ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सबकुछ बिकता है
‘ऑनलाइन’ खरेदी-विक्रीचा कोण कसा वापर करेल सांगता यायचे नाही. अवधूतनेही याचा बेमालूमपणे वापर सुरू केला. ‘सबकुछ बिकता है’ या टॅगलाइनचा उल्लेख असलेल्या एका कंपनीच्या विक्री यंत्रणेचा वापर करून अवधूतने चोरीचा माल हातोहात विकून बक्कळ माया जमवली.

Story img Loader