गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाला रविवारी सात महिने पूर्ण झाले असताना पुरोगामी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने मॉìनग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. तर दुपारी खुनाचा तपास गतीने व्हावा अशी मागणी करणारे एक लाख लोकांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सनातन संस्थेवरील बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केली. दरम्यान, पानसरे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज केंद्रीय तपास पथक कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी तीन स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत तपास जारी ठेवला आहे.
१६ फेब्रुवारी रोजी पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हल्ला केला होता. मुंबईत उपचार सुरू असताना पानसरे यांचे २० फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला पुरोगामी संघटना व गोिवद पानसरे संघर्ष समितीच्या वतीने तपासाला गती मिळावी या मागणीसाठी मॉìनग वॉकचे आयोजन केले जाते. या आठवडय़ात खून प्रकरणी समीर गायकवाड याला अटक केली आहे. त्यामुळे आंदोलकांनी गायकवाडचा सूत्रधार शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आजच्या मॉìनग वॉकवेळी केली.
दुपारी शिवाजी चौक येथे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मुख्य सूत्रधार जेरबंद करावा, या मागणीचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी एक लाख नागरिकांच्या सह्या घेतल्या जाणार आहेत. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी, सनातन संस्थेवरील बंदीबाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी केली. बंदी घालायची नसेल तर तसेही त्यांनी स्पष्ट करावे, असेही पाटील म्हणाले.
समीर गायकवाड या संशयित आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. तथापि तपासी यंत्रणेला अद्याप ठोस माहिती मिळाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तपासाला गती मिळावी यासाठी केंद्रीय तपास पथकाची मदत घेण्याचा निर्णय शनिवारी तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी दिली होती. त्यानुसार रविवारी या पथकाने तपासाचे धागेदोरे उलगडण्याच्या दृष्टीने प्रयत्न जारी ठेवले. त्यांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी तीन स्थानिक अधिकारीही देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.