लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाला करवीरनगरीत गुरुवारपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. या चैतन्यापर्वात जागर करण्यासाठी साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेले करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर सज्ज झाले आहे. भाविकांमुळे मंदिर परिसर फुलून गेला आहे. पहिल्याच माळेला करवीर निवासिनी महालक्ष्मीचे १ लाख ३४ हजारावर भाविकांनी दर्शन घेतले.

राज्यातील नवरात्र उत्सवात करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला विशेष महत्त्व आहे. तोफेची सलामी झाल्यानंतर देवीचे घट बसवण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी शासकीय अभिषेक केला. मंदिर आवारात सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरू लागला आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ महालक्ष्मीला अर्पण

देवीची बैठी पूजा

दुपारच्या आरतीनंतर देवीची बैठी पूजा बांधण्यात आली. श्रीसुक्तामध्ये महालक्ष्मी ही हत्ती, घोडे, गाई सारख्या पशुंच्या सानिध्यांनी प्रफुल्लित होते. तिचे आनंद, कर्दम, श्रीद आणि चिल्कीत असे पुत्रवत ऋषी सदैव तिच्या सेवेत असतात, असा या पूजेचा अर्थ आहे. संजीव मुनीश्वर, सुशांत कुलकर्णी, रवी माईनकर, आशुतोष जोशी या श्री पूजकांनी ही सालंकृत पूजा मांडली.

भाविकांसाठी सुविधा

महालक्ष्मी मंदिरात उत्सव काळात होणारी लाखोंची गर्दी लक्षात घेऊन अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणेचे अत्याधुनिक तंत्राधारे नियोजन, मंदिर आवार, दर्शन रांग परिसरात सीसीटिव्ही, चारही दरवाज्यांत मेटल डीटेक्टर, दर्शन रांगा, भव्य दर्शन मंडप, माहिती फलक, मुख दर्शनाची सुविधा आदी भक्तगणांसाठी नानाविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दरम्यान पहिल्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे १ लाख ३४ हजारावर भाविकांनी दर्शन घेतले.

आणखी वाचा-राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!

अन्नछत्रात वाढ

श्री महालक्ष्मी धर्मशाळा, महालक्ष्मी अन्नछत्र येथील सुविधेत वाढ करण्यात आली आहे. १२५ खोल्यांच्या माध्यमातून एक हजार भाविक येथे राहू शकतात. येथे दररोज तीन ते पाच हजार भाविक भोजन प्रसाद घेतात. नवरात्र उत्सवात हा आकडा आठ ते दहा हजारांवर जातो. भोजनाची वेळ ११ ते ४ अशी दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. पंचमी दिवशी त्रंबोली यात्रेनिमित्त भाविकांना मोफत बस सेवा उपलब्ध केली आहे, असे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.