घरावरील मोर्चांमुळे जिल्हय़ातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्रस्त झाले आहेत. ‘माझ्या घरावर रोज १०० मोच्रे काढले तरी हरकत नाही,’ असे म्हणत त्यांनी आपला त्रागा गुरुवारी व्यक्त केला. नुकताच बांधकाम कामगारांनी पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. आणखी दोन मोर्चे काढण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांनी सहकार, बांधकाम मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे इरादे व्यक्त केले आहेत.
करवीर नगरीत दररोज काही ना काही आंदोलने होतच असतात. आंदोलनाचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांंत जिल्हयातील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा फंडा वाढीस लागला आहे. राज्यात आघाडीचे शासन असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानावर टोल विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुश्रीफ व पाटील या दोघांनीही मोर्चाला सामोरे जात आंदोलनाला पाठिंबा देत कोल्हापूरचा टोल पंचगंगा नदीत बुडविण्याचा शब्द दिला होता. शिवाय बांधकाम कामगारांनी तत्कालीन कामगार मंत्री म्हणून मुश्रीफ यांच्या घरावर अनेकदा मोर्चे काढून तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादीसह, भाजप-शिवसेना, डावे पक्ष यांचाही सहभाग होता.
राज्यामध्ये सत्तांतर होऊन भाजपच्या नेतृत्वाखाली नवे सरकार कार्यरत झाले. तब्बल चार प्रमुख खाती आणि कोल्हापूर व सांगली या जिल्हयाचे पालकमंत्री अशी मोठी जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी बांधकाम, पणन, सहकार व वस्त्रोद्योग या खात्याच्या प्रलंबित तसेच नवीन कामांना गती देण्यासाठी कंबर कसली. तथापि, विविध घटकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा हा प्रकार सुरु झाला.
त्याचा प्रारंभ करताना मुश्रीफ यांनी सहकार क्षेत्राचा मुद्दा उपस्थित करीत सहकार मंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. तेव्हापासून सत्तेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून अनेक संघटना हा मार्ग अवलंबू लागल्या. आता बांधकाम कामगारांनी तीन दिवस बांधकाम मंत्री यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. बुधवारी हा मोर्चा पोलिसांनी रोखला, पण या प्रकारामुळे मंत्री पाटील हे वैतागले असून, त्यांनी घरावर मोर्चा काढण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय वा शासकीय विश्रामगृह येथे मोर्चा काढून माझ्याशी चर्चा करावी, अशी कळकळीची विनंती केली आहे. घरी मोर्चा काढल्याने वृध्द स्त्रियांना व शेजाऱ्यांना नाहक त्रास होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
सतेज पाटलांकडून खंडन
घरावरील मोर्चांच्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले की, मंत्री झाल्यानंतर व्यक्ती सार्वजनिक बनते. त्यामुळे लोकांना त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. अशा मोर्चांना जसे आम्ही सामोरे गेलो तसे पालकमंत्र्यांनी जायला हवे.