कोल्हापूर महापालिकेचा महापौर निवडीवरून सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्षांचा चौथा अध्याय सुरु होत असून, त्याचे पडसाद जिल्हय़ाच्या राजकारणावर दीर्घकाळ उमटत राहणार आहेत. मुश्रीफ यांनी काँग्रेसचा महापौर करण्यास होकार दिल्याने पाटील यांनी त्यांना राज्यपातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असे म्हणत भाजपचा महापौर होण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ वर्तुळाशी चर्चा करून ती यशस्वी करणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षवर्तुळात मुश्रीफ यांची चलती होणार की बारामतीकरांसमोर दादांच्या शब्दाला वजन येणार यावरून या दोन नेत्यांतील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होताना विधानपरिषद सदस्य असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे तब्बल चार महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्रिपद आले. साहजिकच त्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा वाढला. त्यांचे महत्त्व वाढू लागले तसतसे जिल्हय़ातील सहकार क्षेत्रातील नेत्यांनी त्याची धास्ती घेतली. त्यातून संधी मिळेल तेथे पाटील यांच्यावर पलटवार करण्याचा प्रयत्न सुरू राहिला. त्यामध्ये आघाडीवर राहिले ते मुश्रीफ. त्यांच्या कागल मतदार संघातील निराधार लाभार्थीच्या संख्येत कपात झाल्याने त्याचा रोख दादांवर ठेवला गेला. त्यातून मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर भव्य मोर्चा काढला. यामुळे दादांचा तिळपापड झाला. यातून दोघांतील संघर्षांची पहिली ठिणगी उडाली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नियमबाहय़ १४५ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपावरून सहकारमंत्र्यांनी यामध्ये गुंतलेल्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा केली. महापालिका निवडणूक ऐन रंगात आली असताना सहकारमंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह अन्य संचालकांकडून ही रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला. येथे पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झडला. पाठोपाठ महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पाटील-मुश्रीफ यांनी विविध मुद्यांवरून परस्परांवर शरसंधान केले. त्यातून तिसरा जोरदार संघर्ष पुढे आला.
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नसíगक मत्रीची आठवण ठेवून मुश्रीफ यांनी काँग्रेसचा महापौर करण्यास सहमती असल्याचे घोषित केले. याच वेळी पालकमंत्री पाटील यांनी भाजपचा महापौर होईल, असे म्हणत राज्यपातळीवरील निर्णय मुश्रीफांच्या हाती नसून तो वरिष्ठांकडे असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळवू, असा विश्वास व्यक्त केला. या घटनेतून आजी-माजी मंत्र्यांतून चौथ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. या संघर्षांत दोघांची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे. सत्ताधाऱ्यांचे बारामतीकरांशी सूत जुळत असल्याच्या अनेक घटना दिसून आल्या आहेत. त्या पाहता बारामतीकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास दादांना आहे. तर मुश्रीफ यांना आपल्या भूमिकेच्या मागे पक्ष राहील, याची खात्री आहे. पाटील-मुश्रीफ यांचे मनसुबे पाहता महापौरपदाच्या निवडीत नेमकी कुणाची सरशी होणार, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे जिल्हय़ाचे अन् राज्याचेही लक्ष वेधले आहे.