कोल्हापूर : भाजप हा फ्लेक्सवरील नव्हे, तर तो मानवी संपर्कावर आधारित पक्ष आहे. आता एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या सोबत आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्रामविकासाचा रथ जोमाने पुढे नेईल. विविध ३२ समित्यांमध्ये काम करण्याची कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. अशावेळी मतभेद असले तरी मनभेद होऊ देऊ नका, असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना फेटे, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हीच प्रथम क्रमांकावर राहू याचा विश्वास आहे.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, जिल्ह्यातल्या बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई, ताराराणी आघाडी, जनसुराज्य अशा मित्र पक्षांनी मिळून २५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवलेली असून, आगामी निवडणुकीमध्ये जनाधार कुणाला आहे, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
१२१ सरपंच, ११४ उपसरपंच आणि ९७२ ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आल्याचा दावा यावेळी पक्षाने केला. स्वागत सुनील मगदूम, प्रास्ताविक नाथाजी पाटील, तर आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.