कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये संघर्षाचे जोरदार फटाके उडाले असले तरी आता शिवसेना, अपक्ष यांना सोबत घेऊन महापौर बनवण्याचा मनोदय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. याच वेळी त्यांनी शिवसेना, अपक्ष यांच्याबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीतील सदस्यांनी सद्सदविवेकबुद्धीने महापौर निवडीसाठी मदत करण्याचे आवाहन केले. महापौर निवडीचा खेळ आकडय़ांवर चालला असतानाही पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनामुळे आता त्यांचा महापौर खरेच होणार का, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
महापौर निवडीसाठी १६ नोव्हेंबरला बठक होणार असून, त्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचा महापौर होईल असे सूतोवाच करणारे पालकमंत्री पाटील दोन दिवस करवीरनगरी बाहेर होते. या काळात त्यांनी नेमकी कोणती राजकीय खलबते केली, याविषयी वाच्यता न करता त्यांनी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाजपचा महापौर होईल असा आशावाद व्यक्त केला.
महापौर निवडीचे समीकरण उलगडून दाखवताना पाटील म्हणाले, भाजप-ताराराणी आघाडीकडे ३२ सदस्य आहेत. शिवसेनेचे ४ व ३ अपक्ष यांचा पाठिंबा मिळणार आहे. महापौर निवडीसाठी ४१ सदस्यांची गरज असून आम्हाला आणखी दोघा सदस्यांची आवश्यकता आहे. त्याकरिता विधायक भूमिकेतून महापौर निवडीसाठी आम्हाला सहकार्य केल्यास केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवर विकासकामे करण्यामध्ये सुपुत्रता येणार आहे.
टोल विरोधी कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा गजर केला आहे. याकडे लक्ष वेधले असता सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील म्हणाले, राज्यातील टोल धोरणाशी सुसंगत असेच धोरण केंद्र शासनाच्या पातळीवर ठरवले जात आहे. केंद्र शासनाकडे निधी मोठय़ा प्रमाणात असतो. तो राज्यातील रस्त्यांना मिळावा यासाठी राज्यातील काही रस्ते तिकडे वर्ग केले जाणार आहेत. यातून कोल्हापूरच्या जनतेवर व महापालिकेवर कसलाही आíथक बोजा न लागता टोल प्रश्न १ डिसेंबपर्यंत मार्गी लागेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर बनवण्याचा चंद्रकांत पाटलांचा मनोदय
भाजप-ताराराणी आघाडीचा महापौर होईल असे पालकमंत्री पाटील यांचे सूतोवाच
Written by अपर्णा देगावकर
First published on: 07-11-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patils intention to make the mayor