मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया वाढविण्याच्या उद्देशानेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
गायत्री परिवाराचे प्रणव पंडय़ा यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पण त्यांनी सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिला. या जागेवर कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा पाया विस्तारण्याकरिता मराठा समाजातील नेत्याच्या शोधात भाजपचे नेते आहेत. यातूनच राजघराण्यातील संभाजीराजे यांना संधी मिळाली आहे.
संभाजीराजे यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.
दलित समाजातील नरेंद्र जाधव, धनगर समाजाचे डॉ. विवेक महात्मे आणि आता राजघराण्यातील संभाजीराजे यांना राज्यसभेवर संधी देऊन भाजपने जातीचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय गणित बदलणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून निसटलेल्या, शिवसेनेच्या हाती सापडू न शकलेल्या कोल्हापूरच्या या राजघराण्याने आता भाजपची साथ धरल्याने या भागातील राजकीय गणिते बदलणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती घराण्याला मोठा मान आहे. विद्यमान श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे सर्व पक्ष आदराने पाहतात. तर, त्यांचे थोरले पुत्र युवराज संभाजीराजे व युवराज मालोजीराजे यांनी आजवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षांबरोबरच आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवलेली होती. त्यांना आपल्याकडे खेचण्याचा यापूर्वी शिवसेनेनेही प्रयत्न केला होता. पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. मात्र भाजपने यात आघाडी घेत या घराण्याची नाळ पक्षाबरोबर जोडत पक्षविस्तारासाठी पूरक वातावरण तयार केले आहे.