कोल्हापूर : पावसाळा सुरू झाल्यावर तरी पंचगंगा नदीचे प्रदूषणाचे नष्टचर्य संपुष्टात येईल ही अशा फोल ठरली आहे. उलट रविवारी पहाटेपासून पंचगंगा नदी दूषित घटकांच्या रासायनिक पाण्यामुळे दुधाळ फेसाने झाकली गेली आहे. शिरोळ तालुक्यातील त्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे.
पंचगंगा नदी ही सातत्याने प्रदूषित असते. कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, बडे औद्योगिक घटक यांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते असा आरोप शिरोळ तालुक्यातील पंचगंगा बचाव समितीने तसेच पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी सातत्याने केला आहे.
हेही वाचा…कागल तालुक्यात प्रचार कोणी केला मंडलिक गटाला पक्के माहीत – हसन मुश्रीफ
पावसाळा सुरू झाल्यावर तरी पावसाच्या पाण्यामुळे नदीचे प्रदूषण निघून जाईल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. आज पहाटेपासूनच पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित रासायनिक घटकांचा पांढरा शुभ्र थर वाहताना दिसत आहे. या पाण्याला दुर्गंधीचा तीव्र वास येत आहे. नदीचे प्रदूषण झाल्यावर तक्रार केली की कोल्हापुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटीस बजावणीचे काम करते. आताही पुन्हा असेच कागदी घोडे नाचवले जातील अशी भीती ग्रामस्थातून व्यक्त केली जात आहे.