कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या अनेक नेत्यांनी महाराजांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. अनेक ठिकाणी जल्लोष झाला. मात्र या सर्व जल्लोषात छत्रपती संभाजीराजे यांची कमी जाणवत होती.
यावेळी छत्रपती संभाजीराजे हे आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. वाकिघोल या अत्यंत दुर्गम भागात त्यांचा दौरा सुरू होता. शनिवारी दौरा संपवून संभाजीराजे राजवाड्यात परतताच त्यांनी वडिलांची भेट घेऊन अभिनंदन केले. या क्षणाचा फोटो पोस्ट करत त्यांनी विशेष पोस्ट केली आहे.
हेही वाचा…कोल्हापुरात शाहू महाराज यांना ‘वंचित’चा पाठिंबा
संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अभिनंदन बाबा…
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असे संभाजीराजे यांनी नमूद केले आहे.