कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे १ ते ९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार राहुल आवाडे यांनी दिले. त्यांनी स्वीकार करून सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

मुंबई येथील सागर निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार आवाडे, पंचकल्याणक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सागर शंभुशेटे यांनी भेट घेतली. हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून यात जैन धर्माच्या पवित्र परंपरेचे दर्शन घडणार आहे. शंभरपेक्षा अधिक साधु-संतांचे एकाचवेळी दर्शन घडणार असून दररोज सुमारे एक ते दीड लाख श्रावक-श्राविका महोत्सवात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अशा या ऐतिहासिक कार्यक्रमास आपली उपस्थिती लाभल्यास कार्यक्रमाला अधिक गौरव व प्रेरणा मिळेल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महोत्सव कालावधीत निश्चितपणे येण्यास सकारात्मकता दर्शविली. राजकुमार सावंत्रे, स्वप्नील देसाई, दर्शन टारे उपस्थित होते.

Story img Loader