कोल्हापूर : शिवसेनेच्या पहिल्या वाहिल्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस कोल्हापुरात आहेत. मात्र दोन्ही दिवशी त्यांचा एकही कार्यक्रम वेळेवर सुरू झाला नाही. आज सायंकाळी तर कोल्हापूर महापालिकेच्या एका कार्यक्रमासाठी नागरिकांना चार तास तिष्ठत थांबावे लागले. सायंकाळी तर नाट्यगृह ओस पडल्याचे चित्र दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल शिवसेनेच्या अधिवेशनाची सुरुवात सकाळी दहा वाजता होणार होती. मात्र म मराठा समाजाचा मागासवर्ग अहवाल सादर झाल्याने मुख्यमंत्र्यांना मुंबईत थांबणे भाग पडले. त्यामुळे कोल्हापुरात येण्यास उशीर झाला.नियोजित वेळेपेक्षा अधिवेशनाचे उद्घाटन त्यामुळे दोन तास पुढे ढकलावे लागले. मुख्यमंत्री शिंदे हे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन अधिवेशनाला सुरुवात करणार असे सांगण्यात आले होते. पण नंतर ते आज शनिवारी दर्शन घेणार असे जाहीर करण्यात आले. पण काल सायंकाळी त्यांनी दर्शन घेतले. त्यामुळे याही पातळीवर वेळापत्रक कोलमडले.

आणखी वाचा-शिवसेनेच्या महाअधिवेशनात मोदी-शहांच्या अभिनंदनाचे ठराव; कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ

तर आज शनिवारी अधिवेशनाची सांगताही उशिराने झाली. त्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. पण येथेही वेळापत्रकाचा बोजवारा उडाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभा पाच वाजता होणार होती. सभेसाठी मोठा समुदाय जमला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे हे उशिरा पोहचल्याने शिवसैनिकांना प्रतीक्षा करीत थांबावे लागले.

रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत

कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत शासन निधीतून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी 1 वाजता होणारं होता. या कार्यक्रमाच्या नियोजना साठी असलेले सर्व अधिकारी सकाळी १२ वाजल्यापासूनच नाट्यगृहाच्या ठिकाणी थांबून होते. मात्र सायंकाळचे साडे सहा वाजले तरीही सुरु झाला नव्हता. शासकीय कार्यक्रमामुळे सर्व शासकिय यंत्रणा दिवसभर वेठीस धरल्याचं चित्रं होत. महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या राजशिष्टाचार नुसार या ठिकाणी थांबून होते. अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट पाहून केशवराव भोसले सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shindes schedule in kolhapur delayed citizens are suffered as program did not start on time mrj