स्वाइन फ्लू सदृश आजाराने शनिवारी सांगलीत एका मुलीचा मृत्यू झाला असून वाळवा तालुक्यातील एका महिलेचेही कोल्हापूरमधील रूग्णालयात याच संशयित आजाराने निधन झाले आहे. तर नव्याने सांगलीत २ तर मिरजेत ४ संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यासह ग्रामीण भागातही या साथीच्या रोगाने पाय पसरल्याचे स्पष्ट होत आहे.
सांगलीच्या हनुमाननगर मधील दोन वर्षांच्या मुलीला स्वाइन फ्लू झाल्याच्या संशयावरून सांगलीच्या वसंतदादा शासकीय रूग्णालयातील विशेष कक्षात उपचार करण्यात येत होते. तिच्या तोंडातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते. तत्पूर्वी याच आजारावर उपचार करताना तिचे शनिवारी निधन झाले. याशिवाय वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील महिला योगिता पवार हिच्यावर कोल्हापूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. तिचाही शनिवारी मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात स्वाइनसदृश आजाराने बळी पडलेल्यांची संख्या आता २२ वर पोहचली आहे.
दरम्यान, सांगलीच्या शासकीय रूग्णालयात २ आणि मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात ४ रूग्णांवर स्वाइनसदृश आजारावर उपचार करण्यात येत आहेत. महापालिकेने स्वाइन फ्लूचे रूग्ण शोधण्यासाठी गेल्या सप्ताहात रॅपीड सर्वेक्षण केले. मात्र अद्याप या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. या आजारावरील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात जर रूग्ण दाखल झाला तर तत्काळ आरोग्य विभागाला माहिती देण्यात यावी अशा सूचना सर्व इस्पितळांना देण्यात आल्या आहेत. या रूग्णांची माहिती न दिल्यामुळे महापालिका क्षेत्रातील ३५० डॉक्टरांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
स्वाइन फ्लू सदृश आजाराने बालिकेचा मृत्यू
स्वाइन फ्लू सदृश आजाराने शनिवारी सांगलीत एका मुलीचा मृत्यू झाला असून वाळवा तालुक्यातील एका महिलेचेही कोल्हापूरमधील रूग्णालयात याच संशयित आजाराने निधन झाले आहे.
Written by बबन मिंडे
First published on: 12-10-2015 at 02:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child death in swine flu